मुंबई: आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कोणतेही विधान केलेले नाही. आपले विधान हे हॅबिटॅट स्टुडिओत झालेल्या तोडफोड करणाऱ्यांविरोधात होते. त्यात कोणीही विधिमंडळाचा सदस्य नव्हता. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून माफी मागणार नाही. हक्कभंग समितीचा आदर ठेवून त्यांनी कोणतीही शिक्षा दिल्यास ती भोगण्यास तयार असल्याचे शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हक्कभंग समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्याला पाठिंबा देणारे वक्तव्य केल्यामुळे शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग मांडण्यात आला होता. या हक्कभंगावरील सुनावणी हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर पार पडली. यावेळी समितीचे सदस्य आमदार अनिल परब, प्रवीण दरेकर, मनीषा कायंदे उपस्थित हाेत्या. या सुनावणीवेळी सुषमा अंधारे यांना त्यांनी कुणाल कामगाराच्या विडंबात्मक गाण्याला पाठिंबा देणाऱ्या समाजमाध्यमावरील संदेश तसेच वक्तव्यावरून स्पष्टीकरण विचारण्यात आले.

याला उत्तर देताना अंधारे यांनी आपण केलेले वक्तव्य हे एकनाथ शिंदे यांच्याविषयी नव्हते. समितीच ते वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्याविषयी असल्याचे सांगत आहे. आपले वक्तव्य हे हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांविरोधात होते. मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी समितीने आपल्यावर होणारी कारवाई ही राजकीय कारणाने होत असल्याचे वाटत आहे का, असे विचारले असता त्याला सुषमा अंधारे यांनी होकार दर्शवताना आपल्यावर होत असलेली ही कारवाई आपण कोणत्याही ईडी किंवा सीबीआय सारख्या यंत्रणेत अडकू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे राजकीय आकसापोटी ही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे समिती जो निर्णय देईल तो मान्य आहे.

आपण कोणत्याही असंसदीय शब्दाचा वापर केलेला नाही. आपल्या वक्तव्याबद्दल आपण माफी मागणार नाही. समिती जी शिक्षा करेल ती भोगण्यास तयार असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. आपण कुणाला कामराला वैयक्तिकरीत्या ओळख नसल्याचेही त्यांनी समितीसमोर स्पष्ट केले.

सुषमा अंधारे यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे – प्रसाद लाड

या सुनावणीबद्दल माहिती देताना अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुषमा अंधारे यांनी सुनावणीत केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना २२ ते २३ प्रश्न विचारण्यात आले. मात्र कोणत्याही प्रश्नाला थेट उत्तर दिले नसल्याची माहिती दिली. पुढील बैठकीत समिती या प्रकरणाचा पुनर्विचार करून निर्णय घेणार असल्याचे लाड यांनी सांगितले.