स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेवर महाराष्ट्राची छाप

अमृत शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याचे पुरस्कार नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्वीकारले.

अमृत शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात; झारखंड पहिल्या क्रमांकावर तर छत्तीसगढ तिसऱ्या स्थानी

मुंबई : केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या स्पर्धेवर महाराष्ट्राची पुन्हा एकदा छाप पडली आहे.  एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) गटात राज्यातील तब्बल २८ शहरांनी पहिल्या शंभर क्रमांकांमध्ये स्थान मिळविले असून एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील ५८ शहरांनी स्थान मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मध्य प्रदेशातील इंदौर येथील कार्यक्रमात राज्याला द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक झारखंड तर तृतीय क्रमांक छत्तीसगढ राज्याने पटकावला.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत देशातील ४२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील ४३ अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल्या २१७ शहरांनी या अभियानात सहभाग घेतला होता. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागांतील  एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके राज्याला मिळाली आहेत. देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबई शहरास तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नऊ शहरे स्वच्छ शहरे ठरली असून यातील सहा शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वछता पुरस्कार जाहीर झाला आहे तर तीन शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

यामध्ये नागपूर शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादमध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहराचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विभागस्तरीय तीन पुरस्कारांवर राज्याने नाव कोरले आहे. यामध्ये  सातारा जिल्ह्य़ातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्य़ातील शेंदुर्जना घाट या शहराला आणि पुणे जिल्ह्य़ातील सासवड या शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण  इंदौर शहरात झालेल्या कार्यर्करक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी नगर विकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, संचालक डॉ. उदय टेकाळे आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swachh survekshan 2018 rankings maharashtra tops survey with 28 cities

ताज्या बातम्या