मुंबई : ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर नाट्य, साहित्य, संगीत मैफलींची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक आणि अभिनेता असे कलेचे प्रांत गाजवणाऱ्या स्वानंद किरकिरे यांचा ‘गीत स्वानंद’ हा कार्यक्रम होणार आहे. मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत साजरा होणार आहे.
यात विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर होणार आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संगीत कलेला वाहिलेल्या विशेष कार्यक्रमांचे, शास्त्रीय गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतून मातबर कलाकार ‘लिटफेस्ट’च्या मंचावरून आपली कला सादर करणार आहेत. यामुळे रसिकांना विविध सांगीतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.
यावेळी ‘बावरा मन…’ आणि ‘बिखरने का मुझको…’ अशी प्रसिद्ध गीते लिहिणारे नामवंत गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक आणि अभिनेता असे कलेचे प्रांत गाजवणारे स्वानंद किरकिरे यांच्यासह गायन, संगीत आणि अभिनय अशी मुशाफिरी करणारे अजित परब आणि नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत अशा विविध माध्यमातून आपला ठसा उमटविणाऱ्या गायिका धनश्री देशपांडे आदी कलाकार सहभागी होणार आहेत.
विविध माध्यमांतून संगीत साधना करणाऱ्या अशा तीन सुप्रसिद्ध कलाकारांच्या सांगीतिक प्रतिभेने सजलेली एक मैफल यावेळी रसिकांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम १ नोव्हेंबर रोजी मुख्य सभागृह, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी ६:३० ते रात्री ११ या वेळेत होईल.
