मागणी वाढू लागताच मिठाई आणखी महाग

दिवाळीमध्ये मिठाईच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने हलवायांच्या व्यवसायाला चांगलीच झळाळी मिळाली.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दुकानांमध्ये गर्दी

मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बुधवारी दुपारपासूनच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होती. गुरुवारी तर अक्षरश: दुकानांबाहेर रांगा लागल्या. विशेष म्हणजे मिठाईच्या दरात वाढ होऊनही ग्राहक मनसोक्त खरेदी करत होते. मावळलेला करोना कहर आणि शिथिलीकरण यामुळे मिठाईचा गोडवा अधिक वाढल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसले. 

दिवाळीमध्ये मिठाईच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने हलवायांच्या व्यवसायाला चांगलीच झळाळी मिळाली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तापासूनच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली होती. परंतु जिन्नस महागल्याने विक्रेत्यांनी मिठाईचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढवले आहेत.

करोनाकाळात उत्सवाला आलेले साधेपण आणि विस्कळीत झालेली आर्थिक घडी यामुळे मिठाई व्यवसायाला घरघर लागली होती. ही दिवाळी हातून निसटणार अशी भीती हलवायांमध्ये होती. परंतु शिथिलीकरणानंतर बाजारपेठेतील नागरिकांचा प्रतिसाद पाहून हलवायांनी मिठाईचे निरनिराळे प्रकार उपलब्ध केले आहेत. सध्या मिठाईच्या प्रत्येक दुकानात दिवसाला अंदाजे हजार ते बाराशे रुपये किलो मिठाई विकली जात आहे.

अंदाजे दर (प्रतिकिलो)

           पूर्वी                आता

काजूकतली      १००० ते ११००        ११०० ते १३००

मोतीचूर लाडू   ४०० ते ५५०           ५०० ते ६५०

मावा बर्फी     ५५० ते ६५०           ६०० ते ७५०

सोनपापडी      ४०० ते ५००           ५०० ते ५५०

सुकामेवा बर्फी   १२०० ते १४००         १३०० ते १५००

दरात १० ते १५ टक्के वाढ

‘तेल, तूप, दूध, गॅस यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे यंदा मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागली आहे. तरीही सद्यस्थिती लक्षात घेऊन आम्ही केवळ ५ टक्के दरवाढ केली आहे,’ असे चांदेरकर स्वीटसचे राजेंद्र खांबकर यांनी सांगितले. तर काही दुकानांमध्ये दहा ते पंधरा टक्के दरवाढ झाल्याचे निदर्शनास आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sweets become more expensive after demand increases zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या