स्वाइन फ्लूचे एका दिवसात ३२ रुग्ण

तीन महिन्यांत दहा जणांचा मृत्यू

swine flu
(संग्रहित छायाचित्र)

तीन महिन्यांत दहा जणांचा मृत्यू

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मुंबईतही वाढू लागली असून शुक्रवारी एकाच दिवसात या आजाराच्या ३२ रुग्णांची नोंद झाली. या वर्षी २८ एप्रिलपासून ३० जूनपर्यंत मुंबईत १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. स्वाइन फ्लूच्या बळींपैकी निम्म्या रुग्णांना दीर्घ विकाराने ग्रासले होते व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती, असेही पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर महिला, वृद्ध आणि लहान मुलांबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे.

स्वाइन फ्लूने दगावलेल्यांपैकी तिघे जण वृद्ध असून उच्च रक्तदाब व मधुमेहाने ग्रासले होते, दोघांना क्षयरोगाची बाधा झाली होती, तर अन्य एकाला अर्धागवायूचा त्रास उद्भवला होता. उर्वरित मृतांमध्येही तीन गर्भवती व एका लहान मुलाचा समावेश आहे.

यंदाच्या वर्षी २२ जूनपर्यंत २८५ रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली असून गेल्या आठ दिवसांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी, ३० जूनपर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा ३८३वर पोहोचला आहे. त्यातही शुक्रवारी ३२ नवे रुग्ण नोंदवण्यात आले. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांत १८७ पुरुष व १९६ महिलांचा समावेश आहे. यातही वृद्ध व १४ वर्षांखालील मुलांचे प्रमाण जास्त आहे.

स्वाइन फ्लू हा इतर सर्वसाधारण फ्लूप्रमाणे आहे. तो लगेच बरा होऊ शकतो. मात्र मूत्रपिंडाचे आजार, स्थूलता, रक्तदाब, मधुमेह या रुग्णांना याची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. आणि ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार, व्यायाम व योग्य विश्राम घ्यावा.   डॉ. राकेश भदाडे, नायर रुग्णालय (संसर्गजन्य विभाग)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swine flu in mumbai

ताज्या बातम्या