स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी नाशिकहून पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आलेल्या ५८ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. यामुळे शहराबाहेरून उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या ९ वर पोहोचली आहे. मुंबईतील एका रहिवाशाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
नाशिकवरून आलेल्या रुग्णाला उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रास होता. नाशिक येथे १२ फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद दिला जात नसल्याने १३ फेब्रुवारी रोजी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याचा १६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता मृत्यू झाला. आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांपैकी ६० टक्क्य़ांहून अधिक रुग्णांना इतर आजारांचा पूर्वेतिहास असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या १६३ वर पोहोचली असली, तरी बहुतांश रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.