मुंबई : जर्मनीमधील स्टुटगार्डच्या धर्तीवर वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरातील चौकात मुंबईच्या भगिनी शहरांच्या (सिस्टर सिटीज) मैत्रीचे प्रतीक उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून १५ भगिनी शहरांचे ध्वज तेथे फडकणार आहेत. देश-विदेशांतील पर्यटकांसाठी हे स्थळ एक आकर्षण ठरणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने जगातील महत्त्वाच्या शहरांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. त्यामुळेच देशविदेशातील पर्यटक मुंबईभेटीसाठी येत असतात.
मुंबई शहराचा जगातील विविध देशांमधील १५ शहरांबरोबर भगिनी शहर म्हणून मैत्रीचा करार झाला आहे. त्यामध्ये बर्लिन (जर्मनी), लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क (अमेरिका), सेंट पीटर्सबर्ग (रशिया), स्टुटगार्ड (जर्मनी), योकोहामा (जपान), होनोलुलु (हवाई), झाग्रेब (क्रोएशिया), बार्सिलोना (स्पेन), बुसान (दक्षिण कोरिया), पोर्ट ऑफ ओडेसा (युक्रेन), जकार्ता (इंडोनेशिया), नाडी (फिजी), अँटानानारिवो (मादागास्कर) आणि शांघाय (चीन) या शहरांचा समावेश आहे.
या भगिनी शहरांबरोबर सांस्कृतिक संबंध, ज्ञानाची देवाणघेवाण आणि शहरांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. भगिनी शहरांबरोबरच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी पालिकेने कलानगर जंक्शनवर भगिनी शहर चौक (सिस्टर सिटी स्क्वेअर) उभारण्याची योजना आखली आहे. या चौकात भगिनी शहरांच्या देशांचे ध्वज फडकवण्यात येणार आहेत. तसेच या चौकात पर्यटकांना प्रवेश करता येणार आहे.
पर्यावरण आणि राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. भगिनी शहरांमधील अनेक विद्यार्थी मुंबईमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच काही विद्यार्थी भारतातील अन्य शहरांमध्ये शिक्षण घेत आहेत. हा चौक विदेशी विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भगिनी शहरांच्या मैत्रीचे प्रतीक असलेल्या चौकाची उभारणी करण्यासाठी पालिकेने ई-निविदा मागविल्या आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे एक कोटी ६३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सहा महिन्यांमध्ये साकारण्यात येणार आहे. इच्छुकांना येत्या २८ एप्रिलपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. निविदा प्रक्रिया ५ मे रोजी पूर्ण करण्यात येणार असून प्रक्रिया झाल्यावर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर कार्यादेश देऊन चौकाचे काम सुरू करण्यात येईल. या चौकाच्या देखभालीची जबाबदारी याच कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोठय़ा संख्येने विदेशी पर्यटक मुंबईत येतात. तसेच परदेशातील अनेक विद्यार्थी मुंबईत शिक्षण घेत आहेत. वांद्रे येथील कलानगरमध्ये उभारण्यात येणारे भगिनी शहरांच्या मैत्रीचे प्रतीक या सर्वासाठी आकर्षण ठरेल.-किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी-उत्तर