मधुमेहग्रस्तांना धोका; मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्य़ांहून अधिक

मुंबई : उत्तेजकांचा (स्टिरॉईड) वापर आणि अनियंत्रित मधुमेह यामुळे करोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. यात प्रामुख्याने ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण ६० ते ७० टक्के असून, दृष्टी जाणे अथवा मृत्यू होण्याचा धोका संभवतो. या आजाराची भीती न बाळगता वेळेत निदान आणि उपचार घेतल्यास धोका कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
death certificate in Medical in Nagpur
नागपुरातील मेडिकलमध्ये मृत्यू प्रमाणपत्रासाठी ५८ दिवसांची फरफट.. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा असा गोंधळ..
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

अनियंत्रित मधुमेह, कर्करुग्ण, प्रत्यारोपण केलेले किंवा अन्य आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण असलेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. करोना साथीच्या काळात हा धोका अधिकपटीने वाढला आहे. करोनाबाधितांच्या उपचारात प्रामुख्याने उत्तेजकांचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी, अशा काही रुग्णांमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाची बाधा होत असल्याचे आढळले आहे. पैकी बहुतांश रुग्णांना ‘म्युकरमायोकोसिस’ या संसर्गाची लागण होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.

जे.जे. रुग्णालयात पाच ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आढळले असून करोना संसर्गानंतर ६० हून अधिक दिवसांनी याची बाधा झाली आहे. दोन रुग्णांमध्ये संसर्ग डोळ्यांतील रक्तपेशीपर्यंत पोहचला असून, यामुळे दृष्टी जाण्याचा धोका आहे. या रुग्णांचे निदान उशिरा झाले. करोनामुक्त रुग्णांच्या वरचेवर तपासण्या झाल्यास संसर्गाचे निदान लवकर होऊ शकते, असे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी अधोरेखित केले.

सर्वसाधारणपणे ‘म्युकरमायकोसिस’ अनियंत्रित मधुमेहींमध्ये आढळतो. टाळेबंदीच्या काळात अनेक मधुमेहींनी तपासण्या आणि औषधोपचार टाळल्याने त्यांच्यातील साखरेची पातळी अनियंत्रित झालेली आहे. परिणामी संसर्गाचे प्रमाण जवळपास ७० टक्क्य़ांनी वाढले आहे. दर महिन्याला चार ते पाच रुग्ण येत असून बहुतांश रुग्णांना डोळ्यांशी संबंधित आजार असल्याचे केईएम रुग्णालयाच्या नाक, कान आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी सांगितले.

अन्य बुरशीजन्य आजार..

‘म्युकरमायकोसिस’ व्यतिरिक्त ‘अस्परगिलॉसिस’ आणि ‘कॅन्डिडियासिस’ हे बुरशीजन्य आजार करोनाबाधितांमध्ये आढळले आहेत. हे मुख्यत: रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांमध्ये आढळले असून, यातही मृत्युदर ५० ते ८० टक्के आहे.

‘आमच्याकडे गेल्या आठ महिन्यांत दोन ‘अस्परगिलॉसिस’ आणि १४ ‘कॅन्डिडियासिस’ रुग्ण आढळले. यातील ‘अस्परगिलॉसिस’च्या रुग्णांचे निदान वेळेत झाल्याने ते वाचले, तर ‘कॅन्डिडियासिस’च्या चार रुग्णांचा मृत्यू झाला. करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात स्टिरॉईड आणि टोसीलुझुमॅब यांचा अतिवापर केल्याने अशा आजारांचे प्रमाण अधिकतर होते, परंतु मागील तीन महिन्यांपासून कमी झाले’, अशी माहिती वोक्हार्ड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. केदार तोरस्कर यांनी दिली.

‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग हवा किंवा मातीतून होतो. रोगप्रतिकारकशक्ती सक्षम असलेल्यांना यापासून धोका नाही. परंतु रोगप्रतिकारकशक्ती क्षीण असलेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या हवेच्या पोकळ्या म्हणजेच ‘सायनस’मध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेश करते. त्यामुळे इतर बुरशींच्या आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ५० टक्के मृत्युदर असल्याचे अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. माला कनेरिया यांनी सांगितले.

संसर्ग टाळण्यासाठी..

’ करोनामुक्त झालेल्या आणि कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असलेल्या किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक.

’ अनियंत्रित मधुमेह, प्रत्यारोपण केलेले, कर्करुग्ण अशा रोगप्रतिकारकशक्ती क्षीण असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडताना नियमित मुखपट्टीचा वापर करावा, जेणे करून नाकावाटे होणाऱ्या या संसर्गाला प्रतिबंध घालता येईल.

’ हात आणि पायावरील जखमांमधूनही हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जाताना शक्यतो पूर्ण कपडे घालावेत.

’ बांधकामाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ही बुरशी वाढत असल्याने अशा ठिकाणी रुग्णांनी जाणे शक्यतो टाळावे किंवा जावे लागल्यास मुखपट्टीचा वापर करावा.

’ मधुमेह नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक असून वरचेवर तपासण्या कराव्यात.

’ स्टिरॉईडमुळे भूक वाढते, त्यामुळे रुग्ण सतत खात असतात. यामुळे साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आहाराचे योग्य नियोजन करणे आणि जंकफूड टाळणे गरजेचे आहे.

लक्षणे

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे (विशेषत: एका डोळ्याला), डोळे लाल होणे, दृष्टी किंवा नजर कमी होणे.