शैलजा तिवले

प्रगत चाचण्या आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत; संसर्ग प्रसाराचा धोका नसल्याचा निर्वाळा

शहरात करोनामुक्त झालेल्या मोजक्या रुग्णांमध्ये लक्षणांसह पुन्हा करोना चाचणी सकारात्मक आल्याचे निदर्शनास आले आहे. हा जुनाच संसर्ग आहे की नव्याने झाला आहे याचे निदान करण्यासाठी अशा अपवादात्मक रुग्णांच्या प्रगत चाचण्या करणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दक्षिण मुंबईतील रुग्णालयात २४ वर्षांच्या डॉक्टरला १३ मे रोजी करोना असल्याचे निदान झाले. उपचार घेतल्यावर १७ व्या दिवशी चाचणी नकारात्मक आली. कामावर हजर राहण्यापूर्वी दोन नकारात्मक चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक असल्याने ३ जूनला पुन्हा चाचणी केली असता तो ही नकारात्मक आला.  जवळपास १५ दिवसांनी माझ्या वडिलांना लक्षणे दिसल्याने १६ जूनला चाचणी केली. थेट संपर्कात असल्याने २१ जूनला माझ्यासह घरातील सर्वांची चाचणी केली आणि त्यात माझी चाचणी सकारात्मक आली. त्यावेळी घसादुखी, मळमळ, उलटी होणे, वास न येणे ही लक्षणे दिसत होती, असे या डॉक्टरने सांगितले.

जुन्या संसर्गाचा भाग

शरीरात विषाणूचे मृत अवशेष काही काळ असतात. या अवशेषांमुळे संसर्ग झाल्यापासून दोन महिन्यापर्यतही चाचणी सकारात्मक येऊ शकते. संसर्ग झाल्यापासून १३ दिवसांच्या काळातच रुग्ण संसर्ग प्रसार करू शकतो. त्यामुळे बराच काळ चाचणी सकारात्मक आली तरी या रुग्णांपासून संसर्ग प्रसाराचा धोका नसतो, असे संसर्ग आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

४५ आणि ५० वर्षांचे दोन रुग्ण मध्यम लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. दोन आठवडय़ानंतर पुन्हा काही लक्षणे आढळल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले होते. या रुग्णांमध्ये लक्षणे दिसायला लागल्यानंतर काही दिवसांनी श्वास घ्यायला त्रास होत होता. जुन्या संसर्गाचा भाग म्हणून  कदाचित  लक्षणे आढळली असू शकतात, असे वोक्हार्टचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि राज्याच्या विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले.

संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारक शक्ती प्रमाणापेक्षा अधिक कार्यरत झाल्याने काही लक्षणे पुन्हा दिसून येतात याला सायटोकाईन स्ट्रार्म असे म्हटले जाते. ‘कोविड१९’ प्रमाणे करोनाचे अन्य विषाणूही ही हवेत असतात. तेव्हा यांच्या संसर्गामुळे पुन्हा लक्षणे दिसू शकतात. याच्या चाचण्या सध्या केल्या जात नाहीत. योग्य निदान करण्यासाठी अभ्यास होणे गरजेचे आहे, असे टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख  डॉ. रोहिणी केळकर यांनी व्यक्त के ले.

एनआयव्हीमध्येच प्रगत चाचण्या उपलब्ध

इतर संसर्गामुळे करोनासारखी लक्षणे दिसू शकतात. यासाठी बायोफायबर चाचणीमध्ये याचे निदान करता येते. शरीरात विषाणू जिवंत स्वरुपात आहे का यासाठीच्या प्रगत चाचण्या बायोसेफ्टी पी४ पातळीच्या प्रयोगशाळेत करता येतात. कस्तुरबामध्ये पी३ तर के ईएमध्ये पी२ पातळीची प्रयोगशाळा आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था(एनआयव्ही) आणि दिल्लीमध्येच पी४ पातळीच्या प्रयोगशाळा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वाच्या या चाचण्या करणे शक्य नाही. परंतु अपवादात्मक रुग्णांमध्ये डॉक्टरांना शंका असल्यास या चाचण्या करायला हव्यात, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.