उद्धव ठाकरे यांचे मुंबई महापालिकेस आदेश

मुंबई : अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका. मुंबईला देशातील सुंदर, स्वच्छ शहर बनविण्यासाठी मैदानात उतरा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महानगरपालिके स दिले.

  शहरातील मलेरिया, डेंग्यू साथ रोग नियंत्रणाबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूर्व आणि पश्चिाम महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकले जात असून या ठिकाणी कॅमेरे लावून अशा व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. करोनामध्ये पालिके ने चांगली कामगिरी केली आहे. आता रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रित करून कालबद्ध रीतीने ही कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दूरचित्र संवादाच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीस पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच करोना नियंत्रणाबाबतच्या कृती गटाचे सदस्य देखील उपस्थित होते.

 मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा, कुणालाही आरोप करण्याची संधी मिळायला नको असे ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना सांगितले.