महाबळेश्वर आणि सभोवतालच्या परिसरातील गिरीमित्रांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या पुरातन निसर्गवाटांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
महाबळेश्वरमधील २६ ठिकाणी पुरातन निसर्गवाटांचे संवर्धन करण्यासाठी ६० लाख रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (एमटीडीसी) देण्यात आला असून तो मंजूर झाल्यास या रानवाटा सुस्थितीत राहतील, अशी माहिती सातारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच न्यायालयात दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.
हेही वाचा >>> मुंबई : साथरोगांच्या संशोधनासाठी कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत सर्वेक्षण प्रयोगशाळा
महाबळेश्वर, वाई, पाचगणी येथील पुरातन निसर्गवाटांचे संवर्धन आणि जतन करण्याच्या मागणीसाठी ही जनहित याचिका करण्यात आली होती. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्यावतीने सहाय्यक वनसंरक्षक (सातारा) यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात पुरातन निसर्गवाटांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी, विशेषत: अतिवृष्टी, भूस्खलन आणि इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या या वाटांचे संवर्धन करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी प्रयत्न केले जातात. त्यासाठी ६० लाख रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आला आहे तो मंजूर झाल्यास या निसर्गवाटा सुस्थितीत राहतील, असा दावाही प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
न्यायालयाने या प्रतिज्ञापत्राची दखल घेतली. तसेच पुरातन निरर्गवाटांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला देऊन याचिका निकाली काढली.