मुंबई : महिलांना प्रवासात आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन किं वा गार्डशी संपर्क साधता यावा यासाठी महिला डब्यात टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांत महिलांच्या अवघ्या २७ डब्यांतच ही यंत्रणा बसविण्यात पश्चिम रेल्वेला यश आले आहे. परिणामी आजही रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षा टांगणीलाच आहे.

बारा डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी राखीव डबे असतात. सकाळी व सायंकाळी गर्दीची वेळ सोडल्यास पहाटे किं वा रात्रीच्या प्रवासात चोरीच्या निमित्ताने महिला प्रवाशांवर हल्ले करणे, मारहाण करणे इत्यादी गुन्ह्य़ांच्या घटना घडतात. धावत्या लोकलमध्ये अशा घटना घडताना महिला प्रवाशांना मोटरमन, गार्ड किं वा रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून मदतही मागता येत नव्हती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने यावर तोडगा काढत टॉक बॅकसारखी सुरक्षा यंत्रणा महिला डब्यात बसविण्याचा निर्णय घेतला होता. तीन ते चार वर्षांपूर्वी हा निर्णय घेतल्यानंतरही त्याच्या अंमलबजावणीत धिमी गतीच सुरू आहे. अवघ्या नऊ लोकलमधील महिलांच्या २७ डब्यांत टॉक बॅक यंत्रणा बसविण्यात आली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात साधारण १०० लोकल गाडय़ा असून यात पंधरा डबा लोकलचाही समावेश आहे. गेल्या वर्षांपासून करोनाकाळात सीसीटीव्ही, टॉक बॅक यंत्रणा बसविण्याची कामे रखडली. त्यामुळे उर्वरित लोकलच्या महिला डब्यातही टॉक बॅक यंत्रणा बसविण्यासाठी आणखी एक ते दोन वर्षे जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय ४८ लोकलच्या महिला व सामान्य डब्यात एकूण १३९७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याची माहिती सूत्रांनी दिली.