मुंबई – मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तानसा धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने ठरवले आहे. तानसा धरणावर अतिरिक्त सीसीटीव्ही निगराणी प्रणाली बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत धरणावरील आणि परिसरातील अंधाऱ्या किंवा निगराणी कक्षेत नसलेल्या संवेदनशील भागांवर आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष्य ठेवले जाणार आहे. तानसा धरण परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर चोरी करण्याच्या घटनांमुे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात जलाशयांतून दररोज ४१०० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी तानसा धरण हे महत्त्वाचा जलस्रोत असून त्या माध्यमातून मुंबईला दररोज ४५० दशलक्षलीटर एवढा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे मुंबई शहराला अखंड पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी तानसा धरणाचे संचालन आणि देखभाल मुंबई महापालिका करत असते.

तानसा धरण हे १८९२ मध्ये बांधलेले दगडी धरण असून ते मुंबईपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल परिसरात आहे. अलीकडेच तानसा विभागातील वर्कशॉप आणि फिल्टर प्लांट परिसरातून ट्रान्सफॉर्मर आणि वेल्डिंग केबल्स चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. वर्कशॉपजवळ सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे चोरांचा शोध घेणे यंत्रणेसाठी कठीण झाले होते.

भविष्यात अशा प्रकारच्या चोरी, तोडफोड किंवा अनपेक्षित दुर्घटना टाळण्यासाठी ही नवीन अतिरिक्त सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे अत्यंत गरजेचे ठरले होते. या कामासाठी महानगरपालिकेने कार्यालयीन अंदाजपत्रकानुसार ५३,८६,३०५.०० रुपयांच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. या कामासाठी आता कंत्राटदार नेमण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.