मुंबई : नोकरदार महिलांसाठी ताडदेव येथे २३ मजली वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने घेतला आहे. आता या वसतिगृहाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी म्हाडा उपाध्यक्षांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता १५ दिवसांत बांधकामासाठी दुरुस्ती मंडळाकडून निविदा काढली जाईल. वसतिगृहाच्या माध्यमातून ८६० महिलांच्या निवार्याची व्यवस्था केली जाईल. देशभरातून मुंबईत नोकरी व रोजगारासाठी तरुणी, महिला मुंबईत येतात. मुंबईसारख्या महागड्या शहरात घर खरेदी करणे वा भाड्याने राहणे आर्थिकदृष्ट्या अनेकांसाठी परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन नोकरदार महिलांना परवडणाऱ्या दरात निवारा मिळावा, यासाठी म्हाडाने २०२१ मध्ये ताडदेव येथे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला.
ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊंडमधील दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाअंतर्गत महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले. म्हाडाच्या २९८व्या बैठकीत या वसतिगृहाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच प्रकल्पाच्या ६५.८० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तर यासंबंधीच्या प्रस्तावास गृहनिर्माण विभागाची परवानगीही मिळाली. दुरुस्ती मंडळाने या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
त्यानुसार निविदेसंबंधीचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास त्यांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे १५ दिवसांत महिला वसतिगृहाच्या बांधकामासाठी निविदा काढली जाईल, असेही अधिकार्यांनी सांगितले. निविदा प्रक्रिया पूर्ण करून शक्य तितक्या लवकरच वसतिगृहाच्या बांधकामास सुरुवात केली जाईल, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. ताडदेवमधील एमपी मिल कंपाऊंडमधील संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाअंतर्गत महिला वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येईल.
या ठिकाणी वसतिगृहाची २३ मजली इमारत बांधण्यात येणार असून यात ३०० चौरस फुटांचे २१५ गाळे असतील. तर यासाठी अंदाजे ६५.८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या तळमजल्यावर पाच दुकाने, दुकानांद्वारे एटीएम, कपडे धुलाई केंद्र, दवाखाना, औषध दुकान, सलून आदी सुविधा असतील. तर पहिल्या मजल्यावर उपाहारगृह तर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर वाहनतळाची सुविधा असेल. तसेच चौथ्या मजल्यावर योगासन व मनोरंजनासाठी जागा, उर्वरित सर्व मजल्यांवर निवासी गाळे असतील.
