मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी तारिक परवीन याला उच्च न्यायालयाने २०२० सालच्या खंडणी प्रकरणात नुकताच जामीन मंजूर केला. परवीन गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात आहे आणि नजीकच्या काळात त्याच्यावर चालवण्यात येणारा खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे, त्याला जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

एका कच्च्या कैद्याला एवढ्या प्रदीर्घ काळासाठी कारागृहात ठेवणे हे खटला जलदगतीने चालवण्याच्या त्याच्या मूलभूत अधिकाऱाचे उल्लंघन आहे. तसेच, खटल्याविना कारावास म्हणजे त्याला दोषी ठरवण्यापूर्वी दिलेली शिक्षाच आहे, अशी टिप्पणीही न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने परवीन याला दिलासा देताना केली. भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) तरतुदींतर्गत परवीन याच्याविरुद्ध २०२० साली खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी परवीनने जामिनाची मागणी केली होती. जामीन मिळाल्यनंतर परवीनची बुधवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका झाली.फेब्रुवारी २०२० मध्ये परवीन याला अटक झाली होती. त्यामुळे, गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या परवीन याने दीर्घ तुरुंगवास आणि नजीकच्या भविष्यात खटला पूर्ण होण्याीच शक्यता नसल्याच्या कारणास्तव जामिनाची मागणी केली होती.

गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष असतो दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष असतो हा फौजदारी न्यायशास्त्राच्या मूलभूत नियमांपैकी एक नियम आहे. त्यामुळे, एखाद्या कच्च्या कैद्याचे स्वातंत्र्य पाच वर्षांहून अधिक काळ धोक्यात आले असेल तर अशा वेळी हा नियम हलक्यात घेता येणार नाही, असेही न्यायालयाने परवीनला जामीन मंजूर करताना नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर त्याला शिक्षा नक्कीच होईल

पुराव्यांचे पुरेसे मूल्यांकन केल्यानंतर परवीनचा गुन्ह्यातील सहभाग हा खटल्यादरम्यान सिद्ध होऊ शकतो. तसेच, त्याला दोषी ठरवण्यात आल्यास त्याला शिक्षाही होईल. तथापि, परवीन याला आपण केवळ दीर्घ कारावास आणि प्रलंबित खटल्याच्या कारणास्तव जामीन देत असल्याचे न्यायमूर्ती जाधव यांच्या एकलपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले.