‘बीडीडी’ पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची निवड!

मुंबईतील नायगाव व ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : तांत्रिक मुद्दय़ावर निविदा रद्द झाल्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागलेल्या म्हाडाला अखेर वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. या प्रक्रियेत टाटा कंपनीची निविदा सरस ठरली असून वरळी बीडीडी चाळीचे ते अधिकृत कंत्राटदार ठरणार आहेत.

मुंबईतील नायगाव व ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या दोन चाळींसोबत वरळी बीडीडी चाळींचा प्रकल्पही मार्गी लागणार होता; पण निविदा भरण्याच्या पातळीवरच हा प्रकल्प रखडला होता. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात भारतीय कंपन्यांच्या सहभागाबरोबर दोन चिनी कंपन्यांनी व लेबनॉनमधील एका कंपनीने निविदा सादर केल्या. शापूरजी पालनजी या कंपनीनेही वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्वारस्य दाखवले; पण काही तांत्रिक कारणांमुळे या कंपनीला निविदा सादर करता आली नाही.

दोन चिनी व लेबनॉनच्या कंपनीच्या निविदांची तांत्रिक पातळीवर छाननी सुरू असताना शापूरजी पालनजी या कंपनीने निविदांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावरील सुनावणीत शापूरजी पालनजी कंपनीला निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. म्हाडाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मागील काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. निविदा सादर करताना सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचा दावा शापूरजी पालनी कंपनीने केला होता; पण इतर कंपन्यांना निविदा सादर करताना कोणतीही अडचण आली नाही, याकडे म्हाडा व संबंधित सॉफ्टवेअर कंपनीने न्यायालयाचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने म्हाडाचे म्हणणे ग्राह्य़ धरले. त्यामुळे शापूरजी पालनजी कंपनीला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, हे स्पष्ट झाले.

त्यामुळे टाटा प्रोजेक्ट्स, कॅपॅसिट इन्फ्रास्ट्रक्चर सिटिक (चानी कंपनी) आणि अरेबियन कन्स्ट्रक्शन, एसीसी इंडिया या कंपन्यांचे कन्सोर्शिअम स्पर्धेत होते. गुरुवारी सकाळी या निविदा खोलण्यात आल्या. त्यामध्ये टाटा कंपनीची निविदा सरस ठरली. त्यामुळे आता वरळी बीडीडी या मोठय़ा प्रकल्पाचे कंत्राटदार टाटा कंपनीचे कन्सोर्शिअम ठरणार आहे.

सर्वात मोठा प्रकल्प

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात वरळी बीडीडी चाळींचा प्रकल्प सर्वात मोठा आहे. या ठिकाणी १२१ चाळी आहेत. या प्रकल्पाची किंमत सुमारे १० हजार ७०० कोटी रुपये आहे. वरळीत ६७ मजली टॉवर बांधण्यात येतील. दहा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

म्हाडाच्या निविदा प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच शिक्कामोर्तब केले आहे. रहिवाशांना दर्जेदार घरे देण्याबरोबरच परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना गती येणार आहे

– मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tata company to redevelop mumbai bdd chawl

ताज्या बातम्या