हाफकिन संस्थेतील जागेत उभ्या राहत असलेल्या टाटा स्मारक रुग्णालयांच्या इमारतींमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनाही राहण्याची सोय केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शहराबाहेरून येत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अधिवास नसलेल्या इमारतींमध्ये सुविधा देण्याचा विचारही टाटा रुग्णालयाकडून सुरू आहे.
टाटा रुग्णालयात रोज सुमारे शंभर नवीन रुग्ण येतात. देशभरातून येत असलेल्या या रुग्णांपैकी अनेकांची आर्थिक परिस्थिती दयनीय असते. राहण्याची सोयही होत नसल्याने टाटा रुग्णालयाच्या परिसरात पदपथावर अनेक कुटुंबे राहतात. रुग्णांच्या या नातेवाईकांसाठी स्वयंसेवी संघटनांकडून काही प्रमाणात जागा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. टाटा रुग्णालयाने आता याबाबतही पुढाकार घेतला असून हाफकीन संस्थेतील पाच एकर जागेत उभ्या राहणाऱ्या इमारतीमध्ये २५० जणांसाठी राहण्याची सुविधा दिली जाईल, असे टाटा स्मारक रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील डॉ. ब्रिजेश अरोरा म्हणाले.
यासोबतच शहरातील रिकाम्या असलेल्या सरकारी इमारतींमध्येही रुग्णांना राहण्याची सोय करण्याबाबत पावले उचलली जात आहेत.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक, मानसिक मदतीसोबत सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या सामाजिक संघटनांना एकत्र आणण्यासाठी टाटा रुग्णालयाच्या पुढाकाराने ‘कॅन-इंडिया’ या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. टाटा स्मारक रुग्णालय व इंडियन कॅन्सर सोसायटी येथे १९ ते २१ डिसेंबरदरम्यान होत असलेल्या या परिषदेत शंभरहून अधिक सामाजिक संघटना सहभागी होत आहेत. सर्व संघटनांना एकत्र आणून रुग्णांसाठी अधिक व्यापक स्वरुपात सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत कर्करोगासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा निधी अजूनही वापरला गेला नाही. हा निधी वापरण्यासंदर्भात या परिषदेनंतर सामाजिक संघटनांकडून प्रतिसाद मागवण्यात येणार असून ती श्वेतपत्रिका केंद्र सरकारच्या नियोजन आयोगापुढे सादर करण्यात येईल, असे या परिषदेचे अध्यक्ष डॉ. पूर्वीश पारिख यांनी सांगितले.