मुंबई : कर्करोगाच्या रुग्णांसाठी केमोथेरपी महत्त्वपूर्ण उपचार पद्धती समजली जाते. मात्र केमोथेरपीमुळे रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स लक्षणीयरित्या कमी होतात. प्लेटलेट्स वाढविण्यासाठी रुग्णांना महागडी औषधे द्यावी लागतात. रुग्णांना या औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. मात्र यावर पपईच्या पानांच्या रसापासून बनवलेले औषध कर्करोग रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यावर त्यांना पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. या रसामुळे रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स वेगाने वाढतात. टाटा रुग्णालयामध्ये केमोथेरपी घेत असलेले अनेक रुग्ण पपईच्या पानांचा रस पित असल्याचे डॉक्टरांना सांगत होते. केमोथेरपीनंतर कमी झालेल्या प्लेटलेट्समुळे रक्तस्रावाचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरांना अनेकदा केमोथेरपीचे सत्र पुढे ढकलावे लागते. यामुळे उपचाराचा परिणामकारकता कमी होऊन रुग्णांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. या बाबी लक्षात घेत टाटा रुग्णालयामधील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाने यावर २०१८ ते २०२१ या कालावधीत संशोधन केले. या संशोधनात त्यांनी २९१ रुग्णांचा अभ्यास केला. यामध्ये डॉक्टरांनी रुग्णांचे दोन गट केले. यातील एका गटातील रुग्णांना नियमित उपचारासोबत पपईच्या पानाच्या रसापासून बनवलेले कॅरिपील हे औषध दिले. तर दुसऱ्या गटातील रुग्णांना प्लेसिबो दिले. प्लेसिबोमध्ये कोणतेही औषध नसते. कॅरिपील औषध दिलेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले. तसेच या रुग्णांची केमोथेरपी पुढे ढकलण्याची आवश्यकताही भासली नाही. तसेच कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नसल्याची माहिती या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. विकास ओस्तवाल यांनी दिली.
डेंग्यूसारख्या आजारांमध्येही पपईच्या पानांचा रस उपयोगी मानला जातो. मात्र कर्करोग उपचारांमध्ये त्याचा वापर कितपत परिणामकारक आहे, याबाबत पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नव्हता. टाटा रुग्णालयाच्या संशोधनामुळे प्रथमच मोठ्या प्रमाणावरील नियंत्रित वैद्यकीय अभ्यासातून या उपचार पद्धतीला वैज्ञानिक आधार मिळाला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जगातील प्रतिष्ठित कर्करोगविषयक नियतकालिक ‘जेसीओ ग्लोबल ऑन्कोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
केमोथेरपीमुळे होणारी थ्रोम्बोसाइटोपेनिया ही जगभरातील कर्करोग रुग्णांपुढील गंभीर समस्या आहे. पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्सची पुनर्प्राप्ती वेगाने करून रुग्णांना उपचार अखंडितपणे सुरू ठेवण्यास मदत करतो, असे या अभ्यासाचे सहसंशोधक डॉ. रामास्वामी यांनी सांगितले.
परवडणारे आणि पुराव्यावर आधारित उपचार विकसित करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट असून या संशोधनामुळे भारतासह जगभरातील कर्करोग रुग्णांना फायदा होऊ शकतो, असे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले.
लाखोंचा उपचार खर्च फक्त ३०० रुपयांत
कर्करोगाच्या रुग्णांना केमोथेरपी दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील कमी होणाऱ्या प्लेटलेट्स वेगाने वाढविण्यासाठी रोमिलोप्लास्टिन हे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन लाखो रुपयांचे असून, फारच खर्चिक आहे. टाटा रुग्णालयामार्फत रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणारे जेनरिक औषध १५ हजार रुपयांना मिळते. मात्र पपईच्या पानांच्या रसापासून बनवलेली कॅरिपील ही आयुर्वेदिक
गोळी अवघ्या ३०० रुपयांमध्ये मिळते. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च ३०० रुपयांपर्यंत कमी झाला. कर्करोग उपचारासाठी पपईच्या पानांच्या रसावर आधारित हे औषध सहाय्यक उपचार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कमी खर्च, सहज उपलब्धता आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली परिणामकारकता यामुळे भविष्यात अशा उपचारांचा वापर अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
