जगभरातील १०० हून अधिक लेखकांचा सहभाग

 सात साहित्य पुरस्कारांचेही वितरण
टाटा सन्स लिमिटेडतर्फे मुंबईत २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ‘टाटा लिटरेचर लाइव्ह मुंबई लिटफेस्ट’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध साहित्यविषयक कार्यक्रम होणार आहेत. मुंबईत दोन ठिकाणी होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील १०० हून अधिक लेखक यात सहभागी होणार आहेत. यावेळी विविध पुरस्कारांचेही वितरण केले जाणार आहे. नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट आणि जुहू येथील पृथ्वी थिएटर येथे महोत्सवातील कार्यक्रम होणार असून यात विक्रम सेठ, किरण नगरकर, मोना इल्थाहावी, हुसेन झैदी यांच्यासह जगभरातील शंभरहून अधिक लेखक सहभागी होणार आहेत.
महोत्सवात टाटा लिटरेचर प्रथम पुस्तक, उद्योग/व्यवसाय, काव्य, जीवनगौरव असे विविध पुरस्कार दिले जाणार असल्याचे ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’चे संस्थापक आणि संचालक अनिल धारकर यांनी सांगितले. महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून मुंबईसह देशभरातील व जगातीलही साहित्यप्रेमी आणि साहित्यिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ‘टाटा सन्स’च्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. मुकुंद राजन म्हणाले. चार दिवसांच्या महोत्सवात सामाजिक नाटय़, कथा व काव्यवाचन, चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाबाबत अधिक माहिती  www.tatalitlive.in  या संकेतस्थळावर मिळू शकेल. .