मुंबई : टाटा पॉवरने देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला मोठी गती देत नॉर्वेची आघाडीची नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी ‘ओशन सन’ सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारींतर्गत भारतात पहिल्यांदाच मेम्ब्रेन-आधारित नाविन्यपूर्ण तरंगत्या सौर प्रकल्पाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जाणार आहे.
दुसऱ्या ‘भारत-ईएफटीए प्रॉस्पेरिटी समिट’ दरम्यान दोन्ही कंपन्यांमध्ये या महत्त्वपूर्ण सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या अंतर्गत महाराष्ट्रातील टाटा पॉवरच्या मुळशी जलाशयात अंदाजे ३०० किलोवॅट पीक क्षमतेचा तरंगता सौर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ चाचणीपुरता मर्यादित नसून, याद्वारे मिळणारे निष्कर्ष भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील सौर ऊर्जेच्या वापरासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहेत. भारतासारख्या वैविध्यपूर्ण हवामान असलेल्या देशात हे तंत्रज्ञान किती प्रभावीपणे काम करू शकते, याचा व्यावहारिक आणि कार्यान्वयन अनुभव या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपन्यांना मिळणार आहे. यामुळे आगामी काळात देशात मोठ्या स्तरावर तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा मार्ग सुकर होईल.
ओशन सनचे प्रगत मेम्ब्रेन तंत्रज्ञान तरंगत्या सौर पॅनेलची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. यामुळे भारताच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांना मोठी गती मिळेल. तरंगत्या सौर ऊर्जेच्या विस्तारासाठी भारतात प्रचंड क्षमता आहे. राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेच्या अंदाजानुसार, देशात १०२ गिगावॅटपेक्षा जास्त कमाल तरंगती सौर क्षमता आहे. भारत आपली नवीकरणीय ऊर्जा परिसंस्था वेगाने विकसित करत असताना, हे तंत्रज्ञान जमिनीवर बसवलेल्या आणि छतावरील सौर प्रकल्पांना एक उत्तम पूरक पर्याय ठरेल. या पार्श्वभूमीवर, टाटा पॉवरचा मुळशी येथील प्रायोगिक प्रकल्प या तंत्रज्ञानाच्या व्यापक वापरासाठी आवश्यक असलेला तांत्रिक आणि व्यावसायिक पुरावा आधार तयार करण्यास मदत करेल.
पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची तुलना
हा प्रायोगिक प्रकल्पात पारंपरिक तरंगते सौर उपाय आणि अत्याधुनिक मेम्ब्रेन तंत्रज्ञान यांचे वीज निर्मिती, क्षमता वापर घटक, स्थापनेची पद्धत आणि वेळ, विश्वसनीयता, संचालन आणि देखभालीच्या गरजा, भांडवली खर्च आणि एकूण व्यावसायिक व्यवहार्यता यासह अनेक प्रमुख मापदंडांवर मूल्यांकन केले जाईल. या नाविन्यपूर्ण तरंगत्या सौर प्रायोगिक प्रकल्पाद्वारे महत्त्वपूर्ण कार्यान्वयनविषयक माहिती मिळवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले.
