सोमवारी मुंबईला तौते वादळाचा फटका बसल्यानंतर मंगळवारी मुंबईतील सात समुद्र किनाऱ्यांवर तब्बल ६२ हजार १० किलो कचरा वाहून आल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कचरा साफ करण्याच काम पूर्ण केलं आहे. १५ मे रोजी समुद्रकिनारी वाहून आलेल्या कचऱ्याच्या तुलनेत वादळाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी आढळून आलेला कचरा हा तब्बल ८७ टक्क्यांनी अधिक होता. १५ मे रोजी ३३ हजार ११० किलो कचरा साफ करण्यात आलेला. यापैकी गिरगाव आणि दादर समुद्रकिनारी सर्वाधिक कचरा वाहून आला.

विशेष म्हणजे दादरसारख्या काही समुद्रकिनाऱ्यांवर नेहमीपेक्षा अधिक कचरा १८ मे रोजी आढळून आला. तर काही जुहूसारख्या समुद्रकिनाऱ्यावर नेहमीपेक्षा कमी कचरा आढळून आला. समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वाऱ्याची दिशा आणि लाटांची दिशा यामुळे वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर कमी अधिक प्रमाणात कचरा आढळून आल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

“यावेळेस वादळामुळे समुद्रावरील वाऱ्यांची दिशा नेहमीपेक्षा वेगली होती. त्यामुळेच सामान्यपणे कचरा आढळून न येणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर वादळानंतर मोठ्याप्रमाणात कचरा सापडला,” असं सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या झोरु भटेना यांनी सांगितलं. स्वत: जुहू किनाऱ्याजवळ राहणाऱ्या झोरु यांनी घराजवळच्या समुद्रकिनारी जास्त कचरा दिसला नसल्याचंही सांगितलं. “शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांमध्ये कचाराही वाहून समुद्रात जातो. त्यामुळे अशा वादळाच्या वेळी समुद्र हा कचरा पुन्हा बाहेर फेकतो. म्हणूनच शहरातील रस्त्यांवरील कचरा गटारांमधून समुद्रात जाणारी नाही यासाठी योग्य यंत्रणा असली पाहिजे,” असं झोरु सांगतात.

चौपाटय़ांची स्वच्छता करण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. काही चौपाटय़ांची यंत्राच्या साह्य़ाने स्वच्छता करण्यात येते. शनिवार, १५ मे रोजी या चौपाटय़ांवरून ३३ हजार ११० किलो, तर रविवार, १६ मे रोजी ३९ हजार १६० किलो कचरा उचलण्यात आला होता.

गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याची आकडेवारी (किलोमध्ये)

किनारपट्टी  १५ मे १८ मे
गिरगाव ४५०  २९६०
दादर  ५४९०  २८९७०
वर्सोवा ७०९०  ११८५०
मढ २०९०  ३३७०
जुहू ५४७९  ५४२०
चिंम्बाई १०७६०  ८१३०
गोराई १४४० १ ३१०