केंद्र सरकारने आणलेल्या रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयकातील  तरतुदींच्या विरोधात २५ हजार परिवहन कर्मचारी आणि टॅक्सी- रिक्षा मालक येत्या १८ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे निदर्शने करणार आहेत. ‘रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयक २०१४’ यातील तरतुदी सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि कर्मचारी यांना कायमचे उद्ध्वस्त करणाऱ्या असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटना आणि बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे विधेयकाच्या विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. १८ डिसेंबर रोजी कर्मचारी आणि टॅक्सी- रिक्षा मालक दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करणार आहेत. यानंतर सर्व केंद्रीय कामगार संघटना आणि परिवहन कर्मचाऱ्यांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना वरील विधेयक मागे घेण्याची विनंती करतील, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे नेते हनुमंत ताटे यांनी दिली. १ लाख एसटी कर्मचारी, ७ लाख रिक्षा परवानाधारक आणि १५ लाख चालकांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न असल्याने देशभरातील परिवहन कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत.