मुंबईत ४८५ क्षयरुग्णांचे नव्याने निदान; टाळेबंदीत वेळेत निदान न झाल्याचा परिणाम

मुंबई : साथीच्या काळात करोनाकेंद्री आरोग्य व्यवस्थेमुळे वेळेत निदान न झालेल्या ४८५ क्षयरुग्णांचे निदान पालिकेने राबविलेल्या क्षय आणि कुष्ठरोग सर्वेक्षणात झाले आहे. या मोहिमेत १५ कुष्ठरुग्ण नव्याने आढळले आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत क्षयरुग्णांची संख्या तिपटीने वाढली असून कुष्ठरुग्णांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे नोंदले आहे.

दरवर्षी कुष्ठ आणि क्षयरोगाच्या रुग्णांचे निदान करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण केले जाते. यंदा हे सर्वेक्षण १ ते २४ डिसेंबर या काळात शहरात केले होते. सर्वेक्षणानुसार, ९५४७ संशयित क्षयरुग्ण आढळले असून यातून ४८५ क्षयरोगबाधितांचे निदान झाले आहे. गेल्या वर्षी या मोहिमेत १७० क्षयरुग्णांचे निदान झाले होते. त्या तुलनेत या वर्षी तिपटीने वाढलेल्या रुग्णसंख्येची कारणमीमांसा स्पष्ट करताना पालिका क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले की, ‘टाळेबंदीच्या काळात आरोग्य केंद्र करोनासाठी कार्यरत होती. त्यामुळे चाचण्याही मर्यादित होत होत्या. करोना आणि क्षयरोगाची लक्षणे सारखी असल्याने अनेक जण भीतीने तपासणीसाठी आलेले नाहीत, असे या सर्वेक्षणात दिसून आले. समुपदेशनानंतर संशयित रुग्ण तपासणीसाठी आल्याने ४८५ रुग्णांचे निदान शक्य झाले आहे. संशयितांच्या चाचण्या सुरू असून बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.’

या मोहिमेत १६९७ संशयित कुष्ठरुग्ण आढळले असून तपासण्यांमध्ये १५ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. यात १० रुग्ण बहुजिवाणू (मल्टीपॉसिबॅसेलरी) आणि पाच रुग्ण अल्पजिवाणू (पॉसिबॅसेलरी) प्रवर्गातील आहेत. ‘जास्त रुग्ण आर दक्षिण (कांदिवली पश्चिम) येथे आढळले असून इतर रुग्ण आर मध्य (बोरिवली पश्चिम), एल(कुर्ला पश्चिम),

बी (डोंगरी), ई (भायखळा), डी (ग्रॅण्ट रोड), एन (घाटकोपर) या भागात आढळले,’ अशी माहिती मुंबई कुष्ठरोग विभागाच्या संचालक डॉ. जयश्री भोळे यांनी दिली.

‘करोनाच्या भीतीने लोक अंगावरील डाग दाखविण्यासह इतर माहिती देण्यास तयार नसल्याने निदान कमी झाले आहे. तसेच ५० लाख व्यक्तींचे लक्ष्य ठेवले होते; परंतु अनेक घरे बंद असल्याने यापैकी ४३ लाख व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले.’

डॉ. दत्तात्रय वसईकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, कुष्ठरोग विभाग

 

अनेक घरे अद्याप बंदच

करोनाकाळात टाळेबंदीमुळे, भीतीने शहर सोडलेली अनेक कुटुंबे अद्याप मुंबईत परतलेली नाहीत. सर्वेक्षणादरम्यान ही घरे बंद असल्याचे आढळले. त्यामुळे अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचता आलेले नाही, असे डॉ. टिपरे यांनी सांगितले.