विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मूल्यमापन

विद्यार्थ्यांना परीक्षार्थी करण्यास शिक्षण विभागाचा हातभार

विद्यार्थ्यांना परीक्षार्थी करण्यास शिक्षण विभागाचा हातभार

रसिका मुळ्ये,  लोकसत्ता

मुंबई : प्रत्येक मूल वेगळे असते, त्याच्या क्षमता वेगळ्या असतात हे मूल्य रुजवू पाहणाऱ्या शिक्षण विभागाचा प्रवास आता पुन्हा एकदा परीक्षाकेंद्री पद्धतीकडे होत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची योजना शिक्षण विभागाने आखली आहे. परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून त्यासाठी प्रणाली तयार करण्याच्या निविदा विभागाने मागवण्यात आल्या आहेत.

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेवरून सध्या गोंधळ सुरू आहे. पाचवी, आठवीच्या स्तरावर परीक्षा घेण्यास मुभा देणारी सुधारणा शिक्षण हक्क कायद्यामध्ये केल्यानंतर त्याबाबत राज्याने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. असे असताना आता विद्यार्थ्यांना परीक्षार्थी करण्याची स्वतंत्र व्यवस्था राज्याच्या शिक्षण विभागाने केल्याचे दिसते आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा किंवा चाचणीतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळास्तरावर किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत परीक्षा घेण्याचे सूतोवाचही विभागाने केले आहे. त्यानुसार शिक्षकांची वेतनवाढ, त्यांना मिळणारे लाभ हे विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांनुसार ठरण्याची शक्यता आहे.

काय होणार?

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षण आणि मूल्यांकनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सध्या शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांची माहिती संकलित करणाऱ्या ‘सरल’ प्रणालीतील माहितीशी ही नवी प्रणाली जोडण्यात येईल. विद्यार्थिसंख्या, विद्यार्थ्यांचे गुण यांची नोंद नव्या प्रणालीत होईल. त्यानुसार त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. त्यादृष्टीने प्रशिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचीही यंत्रणा असावी अशी गरज निविदेत स्पष्ट करण्यात आली आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न आणि दीघरेत्तरी प्रश्न असे दोन्ही स्वरूपातील प्रश्न असणे अपेक्षित आहे.

विद्यार्थी ते पुन्हा परीक्षार्थी..

विद्यार्थ्यांना विशिष्ट परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार शिक्षकांचे मूल्यांकन होणार असल्याने तेवढय़ाच परीक्षांची तयारी करून घेण्याकडे शिक्षकांचा कल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांचा किंवा वर्गाच्या १०० टक्के निकालाचे महत्त्व अधिक वाढेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालेल्या कौशल्यांचे मोजमाप करण्यासाठी ‘नैदानिक चाचणी’ घेण्याचे प्रयोग राज्यात झाले. मात्र त्याचा मूळ हेतू बाजूला राहिला आणि प्रश्नपत्रिका फुटणे, चाचणीदरम्यान गैरप्रकार होणे यांपासून ते खासगी शिकवणी वर्गात चाचण्यांची तयारी करून घेण्यापर्यंत विविध नमुने राज्यांत दिसले होते.

जागतिक बँकेच्या स्टार प्रकल्पात राज्याची निवड झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यानुसार पुढील योजनांची आखणी करणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय क्षमता चाचणी (नॅशनल अचिव्हमेंट सव्‍‌र्हे) किंवा त्यासारख्या एखाद्या चाचणीमार्फत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य आहे. त्यादृष्टीने शिक्षकांची तयारी व्हावी यासाठी निविदेत अशी अट समाविष्ट करण्यात आली आहे.

दिनकर टेमकर, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Teacher evaluation according to merit of students zws

ताज्या बातम्या