scorecardresearch

शिक्षक प्रशिक्षणाकडे पाठ, मूल्यमापनास टाळाटाळ

डिसले यांनी मात्र १५५३ शिक्षक आणि ४२ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचा दावा केला आहे.

मुंबई : जागतिक शिक्षक पुरस्कारविजेते सोलापूर येथील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी जिल्हा प्रशिक्षण संस्थेतील प्रतिनियुक्तीच्या कालावधीदरम्यान एकही शिक्षक प्रशिक्षण घेतलेले नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली. डिसले यांनी मात्र १५५३ शिक्षक आणि ४२ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, २०१८ ते २०२० या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत वारंवार नोटीस देऊनही डिसले दैनंदिन कामासाठी किंवा कामकाजाच्या मूल्यमापनासाठीही उपस्थित राहिले नसल्याने त्यांच्याबाबत तसे अहवाल देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील शाळेत डिसले शिक्षक आहेत. त्यांची २०१७ मध्ये सोलापूर जिल्हा प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान विषयातील विषय सहाय्यक म्हणून त्यांनी काम करणे आवश्यक होते. मात्र, या प्रतिनियुक्तीनंतर डिसले शाळेत किंवा जिल्हा प्रशिक्षणसंस्थेतही उपस्थित राहिले नाहीत. त्याबाबत सातत्याने विचारणा करूनही डिसले यांनी त्याला दाद दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उपस्थितीची नोंदच सरकारी दप्तरी नाही.

दरम्यान, कामकाजाचे मूल्यमापन करण्याबाबत डिसले यांना बोलावले असता त्यासाठीही ते उपस्थित राहिले नाहीत, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान विषयातील सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या इतर शिक्षकांनीही डिसले कोणतेही प्रशिक्षण किंवा उपक्रमात सहभागी नसत, अशी माहिती दिली.

जागतिक पुरस्कार मिळाल्यानंतर डिसले चर्चेत आले. मात्र, उपस्थिती आणि त्यांच्या कामाबाबत त्यापूर्वीपासूनच सातत्याने तक्रारी असल्याचे शिक्षण विभागातील कागदपत्रांची पडताळणी केली असता दिसून येते. समाजमाध्यमांवरील चर्चा, राजकीय दबाव अशा पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी काम करून डिसले यांची रजा मंजूर करण्याची वेळ विभागातील अधिकाऱ्यांवर आली असली तरीही कोणत्या कारणास्तव डिसले यांना विशेष वागणूक देण्यात यावी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

प्रशिक्षणांचे आदेशच नाहीत..

डिसले यांनी प्रतिनियुक्तीच्या कालावधीत ४२ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचा दावा केला आहे. त्यांनी ज्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्याचा दावा केला अशा कोणत्याही प्रशिक्षणाची नोंद महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे किंवा जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे नाही. शासनाच्या निर्णयानुसार कोणत्याही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून विद्यार्थी किंवा शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे झाल्यास त्याची नोंद असणे आवश्यक असते. मात्र डिसले दावा करत असलेल्या प्रशिक्षणांच्या नोंदी विभागाकडे नाहीत. डिसले यांनी घेतलेली प्रशिक्षणे त्यांच्या आखत्यारित घेतली असल्यास ती कार्यालयाची जबाबदारी म्हणून ग्राह्य का धरावीत? एखादा शिक्षक किंवा शासकीय कर्मचारी खासगी संस्थेबरोबर काम करत असल्यास ते शासकीय म्हणून कसे गृहित धरले जाऊ शकते, असे प्रश्न अधिकाऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

गावातून तक्रारी

डिसले कार्यरत असलेली शाळा द्विशिक्षकी आहे. परंतु डिसले शाळेत हजर राहात नसल्यामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होत होत्या. त्याबाबत गावातून अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे सातत्याने येत होत्या, अशी माहितीही सोलापूरमधील अधिकाऱ्यांनी दिली.

करोनाचे लाभार्थी?

डिसले यांची प्रतिनियुक्ती २०१७ ते २०२० या कालावधीसाठी होती. ३० एप्रिल २०२०मध्ये प्रतिनियुक्तीवरील अनेक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यात डिसले हेही कार्यमुक्त झाले. मात्र, त्यानंतरही शाळेत रुजू झाल्याचा अहवाल त्यांनी अनेक महिने विभागाला दिला नाही. दरम्यान या कालावधीत शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्याने डिसले यांनी शाळेसाठी काम केले का याबाबत संदिग्धताच आहे. (पूर्वार्ध)

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teacher training world teachers award winner ranjit singh disley from solapur zws

ताज्या बातम्या