भिवपुरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक १७ महिने वेतनाविना! | Loksatta

भिवपुरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक १७ महिने वेतनाविना!

कोणी चिवडा विकतो, तर कोणी लोकलमध्ये चिक्की विकतो..

teachers
(प्रतिकात्मक छायाचित्र )

कोणी चिवडा विकतो, तर कोणी लोकलमध्ये चिक्की विकतो.. हे सारे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापकआहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मुलांच्या शिक्षणाची फी भरता येत नाही म्हणून मुलांना शाळेत अपमानित केले जाते, परंतु कोणी वाली नाही. कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांना गेले १७ महिने वेतन देण्यात न आल्यामुळे अखेर त्यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. झोपी गेलेल्या मुंबई विद्यापीठाने या आंदोलनाची दखल घेऊन काल महाविद्यालयात कुलसचिवांना चौकशीसाठी पाठवले. आता वेतन मिळाल्याशिवाय माघार नाही हा निर्धार त्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे व्यक्त केला.

तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात एकूण नऊ महाविद्यालये असून त्यातील अभियांत्रिकी पदवी, पदविका, फार्मसी पदवी व पदविका अशा महाविद्यालयांमध्ये सुमारे दोनशे अध्यापक व सुमारे पावणेदोनशे कर्मचारी आहेत. अध्यापकांना गेले सतरा महिने व्यवस्थापनाने वेतनच दिलेले नाही, असे तेथील अध्यापकांचे म्हणणे आहे. तर कर्मचाऱ्यांना आठ ते बारा महिने वेतन दिलेले नाही. यातील गंभीर बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून त्यांना नियमित पगारवाढ देण्यात आलेली नाही की भविष्य निर्वाह निधीसाठी भरावयाचे पैसेही व्यवस्थापनाने भरले नसल्याचे या अध्यापकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, एआयसीटीईचे अध्यक्ष, राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयापासून ते थेट पंतप्रधानांपर्यंत सर्वाना पाठविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाही जाऊन आम्ही भेटलो. मात्र कोणीच आमची दखल घेण्यास तयार नाही, असे या अध्यापकांचे म्हणणे आहे. अनेक शिक्षकेतर कर्मचारी आपली उपजीविका वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे रिक्षा चालवून अथवा भाजी विकून करत असल्याचे या अध्यापकांचे म्हणणे असून मुंबई विद्यापीठाची स्थानिय चौकशी समिती दरवर्षी तपासणीसाठी येऊन नेमके काय तपासते याचीही चौकशी करण्याची मागणी या अध्यापकांनी केली आहे. वेतन मिळावे यासाठी अनेकदा अध्यापक व कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली, तसेच निवेदने दिली. मात्र २०११ पासून आजपर्यंतच्या सात वर्षांतील १७ महिन्यांचे वेतन देण्यात आले नसल्याचे या अध्यापकांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. एआयसीटीईने ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून केलेल्या चौकशीतही यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीईच्या नियमानुसार पुरेसे अध्यपक नसल्याचे, तसेच भविष्य निर्वाह निधी वेळेवर भरण्यात येत नसल्याचे आढळून आले आहे.

एआयसीटीईने ५ मार्च २०१८ रोजी आपला अहवाल एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांना सादर केला असून राज्याच्या तंत्रशिक्षण संचालक डॉ. वाघ यांना सहसंचालक प्रमोद नाईक यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालातही मासिक वेतन वेळेवर दिले जात नसल्याचे, तसेच पाच ते सहा महिन्यानंतर मधेच कोणत्या तरी तारखेला देणे, चौदा महिने वेतन न देणे, वेतनाबाबतची परिस्थिती व्यवस्थापनाने जाणूनबुजून केली असणे, भविष्य निर्वाह निधी वेळेवर न भरणे, अध्यापकांच्या पदांबाबत एआयसीटीईच्या नियमांची पायमल्ली करणे, नियमित वेतनवाढ न मिळणे, पगारापासून वंचित ठेवणे तसेच विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता संस्था कोणत्याही प्रकारे अडचणीत असल्याचे दिसत नसतानाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नसून या सुविधा वेळेवर मिळणे आवश्यक असल्याचे डीटीई सहसंचालक डॉ. नाईक यांनी नमूद केले. त्याला आता चार महिने झाले, तरी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काहीही कारवाई केलेली नाही. परिणामी अध्यापकांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरु केले असून त्याचा फटका येथील सुमारे हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2018 at 01:21 IST
Next Story
राज्यातील ‘तेजस्वी ताऱ्यां’चा गौरव कौतुकास्पद!