मुंबई : राज्यामध्ये शनिवारी पॅट परीक्षेचा पहिला प्रथम भाषेचा पेपर झाला. मात्र मुंबईतील महानगरपालिकेच्या अनेक शाळांमधील शिक्षकांवर पूर्णवेळ निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविल्याने परीक्षा घेण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नव्हते. त्यामुळे शाळांमधील मुख्याध्यापकांनी अखेर पर्यवेक्षकांची जबाबदारी सफाई कामगार व काही पालकांवर सोपवल्याचा अजब प्रकार शनिवारी घडला. या प्रकारामुळे शाळेतील पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गुणवत्ता तपासण्यासाठी पॅट परीक्षा
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) पॅट परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदाही ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी पॅट परक्षेचे पेपर होणार आहेत. त्यानुसार शनिवारी प्रथम भाषेचा पहिला पेपर शाळेमध्ये पार पडला. एससीईआरटीकडून अपुऱ्या प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थ्यांना त्या कशा उपलब्ध करायच्या, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला होता.
परीक्षा कशी घ्यायची?
मुंबईतील दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षकांना तातडीने निवडणूक कामासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत. परिणाम, शनिवारी घेण्यात आलेल्या पॅट परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या वेळी मुख्याध्यापकांसमोर परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न होता. त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेच्या बहुतांश शाळांमधील मुख्याध्यापकांनी अखेर शाळेतील सफाई कामगारांना वर्गावर पर्यवेक्षक म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला. तर काही शाळांमधील मुख्याध्यापकांनी थेट पालकांनाच विनंती करून त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपवली.
गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता
परीक्षेसाठी पर्यवेक्षकाची जबाबदारी सफाई कामगार व पालकांवर सोपविल्यामुळे पॅट परीक्षेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सफाई कामगार व पालक पर्यवेक्षक असलेल्या वर्गावर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नक्कल (कॉपी) केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये असा प्रकार घडला तेथील शाळांमधील पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
शिक्षकांना परीक्षा कालावधीत मुभा देण्याची मागणी
शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने पॅट परीक्षेच्या पहिल्या दिवशी घडलेला प्रकार पुढे घडू नये, विद्यार्थ्यांचे हित व भविष्य लक्षात घेत परीक्षा कालावधीत शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट द्यावी, अशी मागणी शाळांमधील मुख्याध्यापकांकडून करण्यात येत आहे.
माझ्यापर्यंत तरी अशी कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे असा प्रकार घडलेला नाही. – कीर्तिकुमार किरतकुडवे, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका.
