मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न पदवी महाविद्यालयांमधील पात्र शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम (सीएएस) मुलाखतींची प्रक्रिया सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका आणि पदोन्नतीची प्रक्रिया या एकाच कालावधीमध्ये होत आहेत. त्यामुळे पदोन्नतींच्या मुलाखती स्थगित होण्याची शक्यता आहे. मुलाखतीची प्रक्रिया शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वरूपाची असून तिचा निवडणुकीशी संबंध नसल्याने मुलाखत प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ८ मार्च २०१९ आणि १० मे २०१९ रोजीच्या शासननिर्णयांनुसार सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीप्रमाणे राज्यामधील विद्यापीठ आणि विद्यापीठांशी संलग्न पदवी महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी सीएएसअंतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी तारखेनुसार पदोन्नती मुलाखती घेण्यात येत आहेत. नियोजित कालावधीत मुलाखती घेणे आवश्यक आहे, अन्यथा पात्र शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नती व त्यासंबंधित लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र युनियन ऑफ सेक्युलर टीचरने (मस्ट) निवडणूक कालावधीमध्येही पदोन्नती मुलाखत प्रक्रिया कायम ठेवण्यास परवानगी देण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.
विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सुरू असलेली पदोन्नती मुलाखतीची प्रक्रिया शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वरूपाची आहे. तिचा निवडणुकीशी संबंध नाही. पदोन्नती पूर्णपणे शैक्षणिक कामगिरी, पडताळलेली कागदपत्रे आणि तज्ज्ञ समितीच्या मूल्यमापनावर आधारित असल्याचे ‘मस्ट’ने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
निवडणुकीच्या कालावधीमध्ये मुलाखती स्थगित केल्यास अनेक प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच महाविद्यालये व विद्यापीठांमधील शैक्षणिक दर्जावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे पालन आणि सर्व कार्य पारदर्शक पद्धतीने करून सीएएस पदोन्नती मुलाखती पूर्ण करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आल्याची माहिती ‘मस्ट’चे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी दिली.
