दिवाळी सुट्टीवरून गोंधळ; शिक्षक, पालक संभ्रमात

दिवाळीची सुट्टी १ तारखेपासून जाहीर झाल्यानंतर शाळांनी पालकांना त्यानुसार संदेश दिले

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : शिक्षण विभागातील समन्वयाअभावी शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीवरून गोंधळ निर्माण झाला असून विभागाने अचानक गुरूवारपासून सुट्टी देण्याचे आदेश दिल्याने परीक्षा, निकाल, वेळापत्रक यांबाबत शाळा, पालक संभ्रमात आहेत. सुरुवातीला १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत देण्यात आलेली सुट्टी अचानक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर अशी करण्यात आली आहे.

परीक्षा, शाळा सुरू करण्याबाबत तसेच ऑनलाइन शिक्षणाबात समन्वय आणि नियोजनाच्या अभावाचे दाखले देणाऱ्या शिक्षण विभागाने आता दिवाळीच्या सुट्टीबाबत गोंधळ घातला आहे. मुंबई शिक्षण निरीक्षकांसह अनेक जिल्हा परिषदांनी दिवाळीची सुट्टी १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत असल्याचे जाहीर केले होते. मात्र अचानक बुधवारी राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी असल्याचे परिपत्रक काढले. त्यामुळे पालक, शिक्षक, विद्यार्थी संभ्रमात आहेत. अनेक शाळांच्या परीक्षा सुरू असताना त्या रद्द करून अचानक गुरूवारपासून दिवाळीची सुट्टी जाहीर करायची का असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

अकरावीचे प्रवेश सुरूच

सध्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर अकरावीचे प्रवेश सुरू आहेत. हे प्रवेश घेण्यासाठी ३० ऑक्टोबपर्यंत मुदत आहे. २८ पासून सुट्टी दिल्यास या प्रवेश प्रक्रियेचे काय करायचे असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

सगळा गोंधळ राष्ट्रीय चाचणीसाठी..

विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वयानुसार क्षमता विकसित झाल्या आहेत का, याची पडताळणी करण्यासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय संपादणूक चाचणी (एनएएस) ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेली ही चाचणी यंदा होत आहे. या चाचणीसाठी सुट्टीच्या कालावधीत अचानक बदल करण्यात आल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही चाचणी होणार असल्याची विभागाला तीन ते चार महिन्यांपूर्वीच कल्पना होती. मग सुरूवातीपासूनच सुट्टीचे नियोजन त्या अनुषंगाने का करण्यात आले नाही असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.

संघटनांची नाराजी

सुट्टीच्या कालावधीत अचानक बदल केल्यामुळे विविध शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. विभागातील अधिकारी आणि कार्यालयांमध्ये समन्वय का नाही असा प्रश्न संघटनांनी उपस्थित केला आहे.

झाले काय?

दिवाळीची सुट्टी १ तारखेपासून जाहीर झाल्यानंतर शाळांनी पालकांना त्यानुसार संदेश दिले. त्यानंतर अचानक बुधवारी दुपारी गुरूवारपासून सुट्टी असल्याचे परिपत्रक फिरू लागले. शालेय शिक्षणमंत्र्यांनीही गुरूवारपासून सुट्टी असल्याचे ट्विट केले. त्यामुळे गोंधळलेल्या पालकांनी शाळांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक शाळांमध्ये एखाद दुसऱ्या विषयाची परीक्षा होणे अद्यापही बाकी आहे. त्यामुळे गुरूवारपासून सुट्टी दिल्यास या परीक्षांचे काय करायचे असा प्रश्न आहे. अडचण काय? माध्यमिक शाळा संहितेनुसार सुट्टी देण्याचे अधिकार शाळांना आहेत.  मात्र, शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी शाळांना १ ते २० नोव्हेंबर अशी सुट्टी जाहीर के ल्यामुळे अनेक शाळांनी ३० ऑक्टोबर पर्यंत प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन केले आहे त्या परीक्षांचे नियोजन कोलमडून पडणार आहे. अनेक पालकांनी व शिक्षकांनी गावी जाण्याचे नियोजन केले असून रेल्वे व बसचे आरक्षण केले आहे. दहा दिवस सुट्टी कमी झाल्यामुळे या पालक आणि शिक्षकांची अडचण झाली आहे. त्याचप्रमाणे सहामाही परीक्षांच्या निकालाचे शाळांनी केलेल नियोजनही विस्कळीत होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Teachers parents in confusion over diwali holiday zws

ताज्या बातम्या