भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३७२ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांची मालिका १-०ने जिंकली आणि कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड्समनला ३५,००० रुपये दिले. आव्हानात्मक ट्रॅक आणि खेळपट्टी तयार केल्याबद्दल कौतुक म्हणून ही रक्कम देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी कानपूर कसोटीतही भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने चांगली खेळपट्टी तयार केल्याबद्दल ग्रीन पार्क स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफचे कौतुक करत ३५,००० रुपये दिले होते. मुंबई कसोटीत खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व होते आणि दोन्ही संघातील फिरकीपटूंनी २६ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने १४ खेळाडूंना बाद केले. एजाजने एकूण ७३.५ षटके टाकली. त्याच वेळी, धावांच्या बाबतीत, चारही डावांमध्ये एकूण ८३० धावा झाल्या, ज्यामध्ये एकट्या मयंक अग्रवालने २१२ धावा केल्या.

हेही वाचा – पहिल्याच वाढदिवशी उडणार धुरळा..! लाडक्या लेकीला विराट देणार ‘खास’ गिफ्ट, करोडो क्रीडाप्रेमीही होणार साक्षीदार!

सामना संपल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने सामना एकतर्फी असल्याचे वर्णन केले, परंतु आपल्या संघाला त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले, असे तो म्हणाला. ५४० धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात १६७ धावांत आटोपला. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ६२ धावांवर गारद झाला. भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला. दोन्ही संघांमध्ये कानपूर येथे खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. हा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत गेला आणि भारत एका विकेटने विजयापासून दूर होता.

मुंबई कसोटीतील विजयासह भारत कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनला आहे. त्यांनी न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. किवी संघाने जून २०२१ मध्ये भारताकडून हा मान हिरावून घेतला होता आणि त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने बदला घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india rewards wankhede groundsmen with rs 35000 cheque after win over new zealand adn
First published on: 07-12-2021 at 09:55 IST