गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. संभाजीराजेंनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. शनिवारपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहे. यावेळी संभाजीराजेंनी बोलताना “मला काहीही झालं तर चालेल पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे,” असं म्हटले. दरम्यान, संभाजीराजेंच्या आंदोलनात पत्नी संयोगिताराजेही सहभागी झाल्या आहेत. संभाजीराजेंचे भाषण ऐकताच संयोगिताराजे या भावूक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संभाजीराजे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत आहे. यावेळी कार्यकर्त्याच्या गर्दीत संभाजीराजे यांच्या पत्नी ससंयोगीताराजे या सुद्धा खाली बसलेल्या होत्या. “मी केलेलं हे उपोषण माझ्या निर्णयाने कदाचित माझ्या घरच्यांना हा निर्णय पटलेला नाही, पण मी उपोषण करतोय. मला काहीही झालं तर चालेल पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे, असं संभाजीराजेंनी म्हणताच त्यांच्या पत्नी संयोगीताराजे यांच्या डोळ्यात पाणी आले.
“मी पत्नी म्हणून त्यांची साथ द्यायला इथे आली आहे. मी प्रामाणिकपणे मराठा समाजाला आणि संभाजीराजेंना साथ द्यायला आली आहे. जिजाऊ माँसाहेबांचे आपल्या महाराष्ट्रावर आशीर्वाद आहेत. त्याच दृष्टीकोनातून सर्व महिला इथे आलेल्या आहेत,” असे संयोगीताराजे यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, संभाजीराजे भोसलेंनी उपोषण सुरू करताना आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं नमूद केलं आहे. “सगळ्यांना एका छताखाली कसं आणता येईल, या दृष्टीने माझा लढा आहे. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.