मुंबई: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुणवत्ता व कामातील दर्जा वाढविण्यासाठी सरकारने चार ते आठ मे दरम्यान दुसऱ्या ‘टेक वारी’ या प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यातील सहा हजार कर्मचारी अधिकारी मंत्रालयात उपस्थित राहणार आहे. नऊ लाख कर्मचाऱ्यांसाठी या सप्ताहाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आल्याची माहिती अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली.
राज्याच्या खासगी तसेच शासकीय क्षेत्रातील तंत्रज्ञ, धोरणकर्ते, कलाकार या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणार आहेत, गेल्या वर्षी पासून ही टेक वारीची सुरुवात करण्यात आली आहे. एक आठवडयात ३५ लाख तासांचे प्रशिक्षण या टेक वारी सप्ताहा अंर्तगत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.
या टेक वारी मध्ये ‘सार्वजनिक प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’, ‘सायबर सुरक्षेची मूलतत्त्वे’, आयआयएम बंगळूरुद्वारे ‘सार्वजनिक धोरणाची मूलतत्वे’ आणि आयआयएम अहमदाबादद्वारे ‘रणनीती व गेम थिअरी’ या अभ्यासक्रमांची यादी नियोजनपूर्वक तयार करण्यात आली आहे. वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कसे तयार करायचे, हे आजचे प्रमुख आव्हान आहे. ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. जगभरात यासाठी विविध उपाय राबवले जात आहेत. सिंगापूर आपल्या ‘स्किल्सफ्युचर’ मोहिमेद्वारे कौशल्यविकासावर भर देत आहे. संयुक्त अरब अमिराती संघीय संस्थांमध्ये मुख्य एआय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
एस्टोनिया ‘डिजिटल स्टेट अकॅडमी’ राबवत आहे शासनातील तंत्रज्ञान आता केवळ बॅक-ऑफिसपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते दर्शनी कार्यालयाचा भाग बनले आहे. ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम, २०२३’ नुसार प्रत्येक विभागाला डेटा विश्वस्त म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते. डिजिलॉकर, उमंग, आधार आणि इंडिया स्टॅक यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे नागरिक-शासन संवादात मोठे परिवर्तन घडले आहे.
एआयच्या वापराने तक्रार निवारण, अनुपालन देखरेख आणि सेवा वितरणाच्या पद्धतीत बदल घडत आहे. उदयोन्मुख क्वांटम कॉम्प्युटिंग येत्या काही वर्षांत सध्याच्या सायबर सुरक्षा प्रणालींसमोर नवे आव्हान उभे करू शकते. या बदलांची माहिती नसल्यास अधिकारी कामात मागे पडू शकतात. यात त्यांचा दोष नाही, कारण तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. हीच दरी भरून काढण्यासाठी ‘टेक-वारी’ उपक्रम राबवला जात आहे, असे राधा यांनी सांगितले. टेक वारीची संकल्पना ही केवळ तांत्रिक शिक्षणापुरती मर्यादीत नाही. याच काळात पाच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
