मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी, सोमवारी प्रजासत्ताक दिनी १४ वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्या. परंतु, पहिल्याच दिवशी लोकल सेवेचा गोंधळ उडाला. वातानुकूलित लोकलमुळे हार्बर मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. वातानुकूलित लोकलच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, या लोकलसह इतर सामान्य लोकल विलंबाने धावल्या. परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते वाशी/ पनवेल आणि वांद्रे / गोरेगाव दरम्यान जानेवारी २०२२ साली वातानुकूलित लोकल सेवा सुरू केली होती. परंतु, या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्या मार्गावरील लोकल सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर चार वर्षांनी पुन्हा हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू केली. परंतु, वातानुकूलित लोकल स्थानकात येण्यास, दरवाजे खुले होण्यास, पुन्हा हे दरवाजे बंद करण्यास आणि लोकल मार्गस्थ होण्यास बराच वेळ जातो. यात वेळ खर्ची झाल्याने मागून येणाऱ्या लोकलला विलंब होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांना या सेवेचा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रजासत्ताक दिनी १०० लोकल फेऱ्या रद्द
मध्य रेल्वेवर सोमवारी प्रजासत्ताक दिनी सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात आल्या. या दिवशी १,८१० लोकल फेऱ्यांपैकी १,४७८ लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन होते. परंतु, त्यातही १,४३६ लोकल धावल्या. तर, ४२ लोकल फेऱ्या रद्द झाल्या. यातील मुख्य मार्गावरील २७, हार्बर मार्गावरील ११, ट्रान्स हार्बर मार्गावरील ४ लोकल रद्द करण्यात आल्या. तसेच मध्य रेल्वेवरील १०० हून अधिक लोकल फेऱ्या विलंबाने धावल्या.
वातानुकूलित लोकल सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या लोकलच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड झाला. लोकलचा दरवाजा बंद होत नसल्याने, लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यानंतर घटनास्थळी मध्य रेल्वेचे पथक जाऊन, त्यांनी दरवाज्यात दुरूस्ती केली. परंतु, या घटनेमुळे हार्बर मार्गावरील दोन लोकल सेवा विलंबाने धावल्या.
वातानुकूलित लोकलमध्ये कर्मचाऱ्यांचे पथक तैनात
पहिल्याच दिवशी वातानुकूलित लोकलच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, मंगळवारी या लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले होते. या लोकलमध्ये ७ ते ८ कर्मचाऱ्यांचा ताफा होता. वातानुकूलित लोकलचा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी या पथकाला नेमण्यात आले आहे.
मुंबईकरांचा प्रवास हा घड्याळ्याच्या काट्यावर असतो. काही क्षणासाठी मुंबईकरांची लोकल सुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात आता वातानुकूलित लोकलमुळे सामान्य लोकलमधील प्रवाशांचा प्रवास रखडण्यास सुरुवात झाली आहे. वातानुकुलित लोकलमुळे संपूर्ण हार्बर मार्गाचा वक्तशीरपणा बिघडण्याची चिन्हे दिसून येत आहेत, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
