लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अमरावती येथील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव नजीकच्या पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे, तर दुसरीकडे या खड्डयाच्या तांत्रिक चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावरील ७०१ किमीपैकी नागपूर ते भरवीर असा ६०० किमी लांबीचा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. त्यातील नागपूर ते शिर्डी टप्पा १३ महिन्यांपूर्वी अर्थात डिसेंबर २०२२ मध्ये कार्यान्वित झाला. त्याच टप्प्यात अमरावतीतील एका पुलाला खड्डा पडला आहे. अवघ्या १३ महिन्यातच समृध्दीवर खड्डा दिसल्याने कामाच्या दर्जावर आणि प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खड्डा पडला आहे त्या ठिकाणी एका अवजड वाहनाचे टायर बदलले जात होते. त्यासाठी जॅक लावण्यात आला होता. त्याच्या दबावामुळे काँक्रीट उखडले असल्याचे कारण प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. खड्डा असलेल्या टप्प्यातील रस्त्याचे काम एनसीसी या कंत्राटदार कंपनीकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मुंबई ते नागपूर अंतर जुलैपासून आठ तासांत; भरवीर ते इगतपुरी टप्पा आजपासून सेवेत

दरम्यान, खड्डयाभोवती तात्पुरते कठडे उभारून वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच खड्डयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या तीन-चार दिवसात दुरुस्ती पूर्ण होईल आणि वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे. याविषयी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता त्यांनी या खड्डयाच्या तांत्रिक चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे लोकसत्ताला सांगितले. नागपूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून ही तांत्रिक चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत खड्डा पडण्याचे नेमके काय कारण आहे हे स्पष्ट होईल, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.