मुंबई : विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची पडताळणी करण्यासाठी ‘निपुण’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत चाचण्या घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळांमध्ये घेऊन जाण्याची नामुष्की सध्या शिक्षकांवर ओढावली आहे. इतका प्रवास करूनही अॅपमधील सदोष चाचण्यांमुळे विद्यार्थ्याचा प्रतिसाद त्यांच्या नावासमोर दिसेल याची खात्री नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

वयानुसार विद्यार्थ्यांनी कौशल्ये, क्षमता आत्मसात केल्या आहेत का, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने ‘निपुण’ उपक्रम सुरू केला. स्वयंसेवी संस्थांकडून केली जाणारी सर्वेक्षणे, त्यातून दिसणारी शैक्षणिक दुरवस्था, होणाऱ्या चर्चा, वाद या पार्श्वभूमीवर शासनानेच विद्यार्थ्यांची पडताळणी सुरू केली. अध्ययन निष्पत्तीच्या निश्चित केलेल्या निकषांनुसार चाचण्या घेण्यात येतात.

आतापर्यंत राज्यात लेखी, तोंडी चाचण्या घेऊन शिक्षक त्याचे निष्कर्ष शिक्षण विभागाला कळवत होते. मात्र, गेल्या वर्षी अगदी मोजक्या शाळांमध्ये प्रायोगिक स्तरावर अॅपच्या माध्यमातून चाचण्या घेण्याचे फर्मान शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी काढले. त्यानुसार सध्या पहिली ते पाचवीच्या चाचण्या घेण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड आहे.

शिक्षकांच्या व्यथा

– अॅपमधील त्रुटी, ते वापरण्यासाठी आवश्यक वातावरण, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत. अॅपच्या माध्यमातून चाचणी घेण्यासाठी इंटरनेट वापरावे लागते. अनेक दुर्गम भागांत इंटरनेट सुविधा सक्षम नाहीत. त्यामुळे अॅप वापरण्यात अडचणी येतात. काही गावांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यासाठी जवळपासचे इंटरनेट जोडणी चांगले असलेली गावे गाठली आहेत. परंतु शाळेजवळ रस्ता, रेल्वे स्थानक असेल तरी तेथील आवाजामुळे चाचणी घेण्यात अडचणी येत असल्याची व्यथा शिक्षकांनी मांडली.

निकालाची शाश्वती नाही

अॅपमधील चुकीचा मजकूर विद्यार्थ्यांनी बरोबर लिहिला तरी तफावत दिसत असल्यामुळे विद्यार्थ्याला त्याचे गुण मिळत नाहीत. विद्यार्थ्याचे प्रतिसाद अॅपवर नोंदवल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर त्याने दिलेल्या प्रतिसादाऐवजी अन्य विद्यार्थ्याचा प्रतिसाद दिसतो. त्यामुळेही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याचे पुणे जिल्ह्यातील एका शिक्षकांनी सांगितले.

शिक्षक अध्ययन निष्पत्तीनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची सूक्ष्म आणि संवेदनशील पडताळणी करतात. मात्र शिक्षकांवर अविश्वास दाखवत यंत्राच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या चाचण्यांमध्ये उच्चारभिन्नतेमुळे बरोबर उत्तरेही चुकीची ठरवली जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ढकलले जात आहे. – भाऊसाहेब चासकर, शिक्षक