तांत्रिक कारणामुळे मुंबईसह देशभरातील सर्व ऑनलाईन पारपत्र (पासपोर्ट) सेवा केंद्रावरील कामकाज दुपापर्यंत ठप्प झाल्याने सकाळपासून पारपत्र नोंदणीसाठी प्रतिक्षेत असलेल्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. देशभरात तब्बल ७० पारपत्र सेवा केंद्र आहेत. पारपत्र काढू इच्छिणाऱ्यांना या केंद्रांकडून ठराविक वेळ देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. पण, शुक्रवारी या केंद्रांवरील ऑनलाईन सेवा सकाळपासूनच ठप्प झाली होती. त्यामुळे, नोंदणीसाठी आलेल्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. शेवटी दुपारी एकच्या सुमारास सेवा पूर्ववत झाल्यानंतर नोंदणी सुरू करण्यात आली. तोपर्यंत सकाळपासून केंद्रावर आलेल्यांना ताटकळत थांबावे लागले.
संतोषकुमार गुप्ता यांना अंधेरीच्या एमआयडीसी ‘पारपत्र सेवा केंद्रा’वर सकाळी ९.४५ची वेळ देण्यात आली होती. ते ९.१५ वाजताच कार्यालयात पोहोचले. पण, त्यांना कित्येक तास खोळंबून राहावे लागले. अखेर दुपारी चार वाजता त्यांचे नोंदणीचे काम संपवून ते केंद्रातून बाहेर पडले. गुप्ता यांच्याप्रमाणेच अनेकजण ताटकळत थांबले होते. त्यात गरोदर महिला, विद्यार्थी आदींचाही समावेश होता. ‘अस्वस्थ ग्राहकांना नेमके काय झाले आहे याचे उत्तर केंद्रावरून दिले जात नव्हते. त्यामुळे आम्ही सगळे गोंधळून गेलो. तांत्रिक गोंधळ आहे हे आम्हीही समजू शकतो. पण, केंद्रावर दिली जाणारी वागणूक फारच क्लेशदायी होती,’ अशी प्रतिक्रिया गुप्ता यांनी दिली.
पारपत्र ऑनलाईन सेवा केंद्रे टीसीएस या आयटी कंपनीमार्फत चालविली जातात. या संबंधात वरळी येथील प्रादेशिक पारपत्र अधिकारी विनय कुमार चौबे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.