मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करताना वरून खाली पडून एका तांत्रिक पर्यवेक्षकाचा मृत्यू झाला. दुर्गेश पांडे (३०) हा प्रभात असोसिएट्स स्टोअर या कंपनीत तांत्रिक पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. ही कंपनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत आहे.

गुरुवारी संध्याकाळी पांडे आपल्या सहकाऱ्यासोबत विमानतळावरील लेव्हल २ वरील आगमन पट्टा क्रमांक १४ च्या वरील भागात फॉल्स पट्ट्याची (बेल्टची) तपासणी करण्यासाठी गेला होता. तपासणी सुरू असताना तो अचानक तोल जाऊन २५ फूट उंचावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पांडे याला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरमन्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सहार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.