scorecardresearch

तंत्रज्ञान शिक्षकांना पर्याय असू शकत नाही – सुप्रिया सुळे

करोनाकाळात तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक गोष्टी सुकर झाल्या, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले तरीही तंत्रज्ञान हे शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवायला हवे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.

(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : करोनाकाळात तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक गोष्टी सुकर झाल्या, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले तरीही तंत्रज्ञान हे शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवायला हवे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले. शिक्षणाचा विचार करताना रजा, सुट्टय़ा यांपलीकडे चर्चा होणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.

यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत त्या बोलत होत्या. ‘द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर यंदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत आदी उपस्थित होते.

घराघरात शिक्षण पोहोचणे ही काळाची गरज आहे. शिक्षणात लोकांचा, शिक्षकांचा पुढाकार असायला हवा. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे चांगले आहे. यानुसार अनेक बदल केल्यास शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होऊ शकतील, असे डॉ. काकोडकर या वेळी म्हणाले. राज्यात ३८ हजार द्विशिक्षकही शाळा असून या शाळा बंद करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्याची गरज आहे. शाळांची पटसंख्या पाहाताना ती शाळा कोणत्या भागात आहे याचा विचार करून पटसंख्येचे निकष तयार करणे आवश्यक आहेत. संपूर्ण राज्यात एकच निकष असू शकत नाही. शाळांच्या भौतिक सुविधांवर विशेष भर देऊन शाळा अधिक तंत्रस्नेही कशा होतील यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

द्विशिक्षकी शाळांच्या समस्यांवर चर्चा

दिवसभराच्या या कार्यक्रमात द्विशिक्षकी शाळांचा पट वाढविणारे शिक्षक, शिक्षणाधिकारी आदींनी आपले अनुभव सांगितले आणि या शाळा कशा अधिक चांगल्या झाल्या हे सांगितले. याचबरोबर या शाळांच्या समस्यांवरही ऊहापोह करण्यात आला. एक शिक्षक रजेवर गेल्यावर एका शिक्षकावर ताण येतो या मुद्दय़ावरही या वेळी चर्चा करण्यात आली. ‘दिवसभरात समोर आलेल्या द्विशिक्षकी शाळांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी एक कार्यगट तयार करावा, असे सुळे यांनी या वेळी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Technology option teachers supriya sule technology things students teachers ysh

ताज्या बातम्या