मुंबई : मध्य व पश्चिम रेल्वेद्वारे गणपती विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली असून, लाखो प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचे तिकीट आरक्षित केले आहे. गणेशोत्सव १४ सप्टेंबर रोजी असून यानिमित्त आयआरसीटीसीद्वारे रेल्वे प्रवाशांना उकडीच्या मोदकांचा प्रसाद देण्यात येणार आहे. मुंबई – गोवा दरम्यान धावणाऱ्या ‘तेजस एक्स्प्रेस’मधील प्रवाशांच्या जेवणाचा स्वाद मोदकाने वाढविला जाणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून गणपतीची १४ सप्टेंबर रोजी प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. आता आयआरसीटीने प्रवाशांना उकडीचे मोदक प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-कोकण रेल्वेमार्गे प्रवास गोड करण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळतर्फे (आयआरसीटीसी) गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस व गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला वाव देण्यासाठी व प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उकडीच्या मोदकांचे वाटप करण्यात येईल, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात तपासणी मोहीम सुरू
– अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हॉटेल, उपाहारगृह व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर धडक कारवाई सुरू केली. तर, आयआरसीटीसीनेही रेल्वे स्थानकातील व रेल्वेगाड्यांमधील खानपान केंद्र, स्वयंपाकघर येथे तपासणी मोहीम सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेचे व कारवाईचे सत्र गणेशोत्सवात सुरू राहणार आहे. नियमांचे भंग करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
– रेल्वेगाड्या व स्थानकांवर खानपान सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वैध ‘क्यूआर’ कोडयुक्त ओळखपत्र आणि निर्धारित गणवेश बंधनकारक केले आहे. याशिवाय खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता व सेवा यासंबंधी निर्धारित निकषांचे पालन करणे आवश्यक केले आहे. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
– स्थानकांबरोबरच गाड्यांमध्येही नियमित आणि अचानक तपासण्या सुरू असून, केवळ अधिकृत कर्मचारीच खानपान सेवा देत आहेत, याची खात्री केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास करारातील अटी आणि प्रचलित नियमांनुसार संबंधित सेवा प्रदात्यांवर दंडात्मक, तसेच सुधारात्मक कारवाई केली जाणार आहे, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
