मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे हे आजारपणातून ठणठणीत बरे होताच त्यांनी जंगलातील शोधमोहीम हाती घेतली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सह्याद्रीच्या पश्चिम घाटात शिंगळा माशाच्या नवीन आणि दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे. याआधी कोकणातील हिरण्यकेशी या दुर्मिळ माशाची प्रजात त्यांनी शोधली होती.

तेजस ठाकरे हे निसर्गप्रेमी असून आपल्या जंगल सफरीतून आणि संशोधनातून त्यांनी मागील काही वर्षांत अनेक प्रजातींचा शोध घेतला आहे. यावेळी त्यांनी सह्याद्रीच्या खोऱ्यातून शिंगळा (केफिश) माशाच्या नव्या प्रजातीचा शोध घेतला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांत काही विशिष्ट ठिकाणी ही माशाची प्रजात आढळते. वाढते औद्योगिकीकरण आणि प्लास्टिकचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळल्याने माशांच्या अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तेजस ठाकरे यांचा वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून अशाच प्रजातींचा शोध घेतला जात आहे. या संशोधनात संशोधक बालाजी विजयकृष्णन आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अभिषेक शिर्के यांनी सहभाग घेतला.

शिंगळा माशाची ही प्रजात उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळते. या प्रवाहात असलेले वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण या माशाला लपण्यासाठी तसेच अन्न शोधण्यासाठी पोषक ठरते. याआधी पश्चिम घाटात ‘अमलीसेप्स’ वंशातील या माशाच्या अन्य प्रजातींच्या शोधाचे दाखले उत्तरेकडील भागातील संशोधनात मिळतात.

माशाची संरचना

दुभंगलेली शेपूट, अपूर्ण मध्य रेखा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या आकाराच अशी नव्या माशाची वैशिष्ट्ये आहेत. शेपटीचा भाग त्याच्या पुढील शरीराशी साधर्म्य न दाखवणारा असल्याने यातून त्याच्या संरचनेतील भिन्नता आणि वैशिष्ट्य स्पष्टपणे दाखवते. याला शास्त्रीय भाषेत ‘अडिपोझ फिन’ची असे संबोधले जाते. माशाच्या या प्रजातीचे नामकरण ‘अमलीसेप्स वायव्य’ असे करण्यात आले आहे.

कुठे आढळतो?

सह्याद्रीच्या कुशीतून नव्याने शोधलेल्या माशाचा समावेश ‘अमलीसेप्स’ कुळात करण्यात आला आहे. माशाच्या नव्या प्रजातीची नोंद गोवा व महाराष्ट्रातील काही मर्यादित ठिकाणांवरून झाली आहे. दोन्ही राज्यांतील अंतर अधिक असल्याने प्रजातीची उपस्थिती खूपच कमी व विखुरलेल्या ठिकाणी दिसून येते. या भागांतील ओढे व प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांत ही प्रजात आढळते.अशा संवेदनशील अधिवासांचे जतन केल्यास गोड्या पाण्यातील अनेक माशांच्या प्रजातींचे संरक्षण होऊ शकते. मात्र खाणकाम, औद्योगिक सांडपाण्याचा निचरा, सूक्ष्म प्लॅस्टिकचे प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे सोडलेल्या माशांच्या परकीय प्रजाती यांसारख्या अनेक हस्तक्षेपामुळे येथील जलपरीसंस्थांना धोका निर्माण झाल्याची बाब या संशोधनात नोंदवण्यात आली आहे.