मुंबई: माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांना प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. आठवडाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मातोश्री निवासस्थानी तेजस ठाकरे यांची संसर्गजन्य तापामुळे प्रकृती खालावली. त्यामुळे बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर पूर्णतः लक्ष ठेवून होते. उद्धव ठाकरे स्वतः डॉक्टरांच्या संपर्कात होते. तब्बल आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना मातोश्रीवर परतण्याची डॉक्टरांनी परवानगी दिली. गुरुवारी १९ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

तेजस ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय व ठाकरे कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र ठाकरे कुटुंबीयांचे स्नेही तसेच हितचिंतकांनी तेजस ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांशी संपर्क साधला. तेजस ठाकरे आता पूर्णतः बरे झाले असून डॉक्टरांकडून त्यांना आणखी काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तेजस ठाकरे हे सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी, वन्यजीव संशोधक म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. पश्चिम घाटात वन्यजीव संशोधनादरम्यान त्यांनी पाली, खेकडे, सरडे तसेच दुर्मिळ माशाच्या प्रजाती शोधल्या आहेत. अंबोली येथील संशोधनादरम्यान त्यांनी शिस्तुरा हिरण्यकेशी ही माशाची दुर्मिळ प्रजाती शोधली होती.

राजकारणापेक्षा जंगल सफारीत अधिक रस असल्याचे मत त्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त केले आहे. तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत वन्यजीवांच्या ६० हून अधिक नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली असून, तामिळनाडूमध्ये सापडलेल्या ‘गेको’ (पाल) च्या एका प्रजातीला तेजस ठाकरेंचे नाव देण्यात आले आहे.