मुंबई: महाराष्ट्राच्या भूमीवरून सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य करीत केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात लढय़ाचे नेतृत्व करण्याचा मानस तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुंबई भेटीत रविवारी व्यक्त केला असला तरी देशाच्या राजकारणातील बुजूर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राव यांच्या राजकीय खेळीला अजिबात महत्त्व दिले नाही. तर काँग्रेसशिवाय बिगर भाजप पक्षांची आघाडी यशस्वी होऊ शकत नाही याची आठवण काँग्रेसने करून दिली.
चंद्रशेखर राव यांचे भाजपबरोबर बिनसल्यापासून त्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी उभारली आहे. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच विरोधी आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे असावे, अशी चंद्रशेखर राव यांची इच्छा दिसते. मुंबई भेटीत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांचा सूर तसाच होता. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पण चंद्रशेखर राव यांच्या समक्षच शरद पवार यांनी त्यांना थंडा प्रतिसाद दिला. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत तेलंगणातील विकास मुद्दय़ांवर चर्चा झाली. फक्त विकास, विकास आणि विकास यावर चर्चा झाली. भेटीत राजकीय चर्चा फारशी झाली नाही, असे सांगत पवार यांनी राव यांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नांना फारसे महत्त्व देत नाही हेच अधोरेखित केले. काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी आकाराला येऊ शकत नाही वा यशस्वी होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर राव यांनी संसदेत भाजपला मदत होईल अशीच भूमिका आतापर्यंत घेतली होती. आता त्यांचे विचार बदलले आहेत. त्यांच्या भाजपच्या विरोधात बदललेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांचा भाजपला सक्षम पर्याय होऊ शकत नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.