विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी

येत्या शैक्षणिक वर्षांपासून वर्गातील अध्यापनाबरोबरच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षांपासून वर्गातील अध्यापनाबरोबरच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यात शिक्षणासाठीच्या बारा स्वतंत्र वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले असून यातील एका वाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट), अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (जेईई) मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाने नुकतीच येत्या शैक्षणिक वर्षांची उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. त्यानुसार स्वतंत्र शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्राने देशभरातील विविध भाषांमध्ये २०० शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्याअंतर्गत राज्यात बारा वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुलैपासून या वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत. डीडीच्या डिशवर सुरुवातीला २४ तासांच्या या वाहिन्या सुरू करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खासगी कंपन्यांमार्फतही त्या उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर यूटय़ूबवरही त्याचे प्रसारण होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या या वाहिन्यांसाठी अभ्यास साहित्य तयार करण्याचे काम सुरू असून साधारण महिन्याभराचे भाग प्रदर्शित करता येतील एवढे साहित्य तयार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र वाहिनी पहिली ते बारावी प्रत्येक इयत्तेसाठी या वाहिन्यांमार्फत अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अटीतटीची स्पर्धा असणाऱ्या नीट, जेईई या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सुरू होणाऱ्या वाहिन्यांवर मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी या भाषांमधील साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. दरदिवशी साधारण सहा नवे भाग आणि त्याचे पुनप्र्रसारण अशी २४ तासांची आखणी करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या प्रकल्पातून मिळणारा निधी, समग्र शिक्षण अभियानातून मिळणारा निधी अभ्यास साहित्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे.

शाळा सुरू झाल्यावर नियोजन..

करोनाची साथ शिगेला असताना गेली दोन वर्षे राज्यातील शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन बंद होते. त्यापूर्वीच बालचित्रवाणीच्या माध्यमातून प्रसारित होणारा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर मार्गदर्शन कार्यक्रम बंद झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग मर्यादित होते. तेव्हापासूनच राज्यात स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, करोना कालावधीत शिक्षण विभागाला हे साध्य झाले नाही. आता परिस्थिती निवळल्यानंतर विभागाच्या नव्या शैक्षणिक वाहिन्या सुरू होत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Television student guidance planning educational channels medical engineering entrance examinations ysh

Next Story
मुंबईत २१८ नवे करोनाबाधित
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी