मुंबई : गेले काही दिवस तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या तापमानाचा पारा घसरला असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उकाडा कायम आहे. दरम्यान, पुढील चार – पाच दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार नाही. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लगाणार आहे.

हेही वाचा >>> परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन

तापमानात घट झाल्यामुळे मुंबईत उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे तापमानात घट झाल्यानंतरही उष्मा जाणवत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३२.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रावरील तापमान सोमवारच्या तुलनेत १ अंशाने कमी नोंदले गेले. मुंबई तसेच उपनगरांत पुढील चार – पाच दिवस कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. मात्र हवेतील उष्मा कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.