या वर्षांत जून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर महिन्यातील दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे. निलोफर वादळामुळे निर्माण झालेला तात्पुरता गारवा नाहीसा झाल्यावर पुन्हा तापमान वर चढण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत मुंबईतील तापमानाचा पारा सोमवारी ३७ अंश से.पर्यंत चढला. हे तापमान गेल्या १० वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वाधिक कमाल तापमान आहे.
१० जून रोजी ३८ अंश से. असे सार्वकालिक सर्वाधिक तापमान नोंदले गेल्यावरच या वर्षांतील तापमानाची चुणूक येऊ लागली होती. सप्टेंबरच्या २९ तारखेला ३७ अंश से.ची नोंद झाल्यावर यावर शिक्कामोर्तब झाले. अधिकाधिक तापदायक होत असलेल्या ऑक्टोबर हीटचा अनुभव तर गेल्या काही वर्षांत मुंबईकरांना येतच आहे. हे वर्ष त्यात आणखी एक पाऊल पुढे गेले. या वेळी तब्बल दोन वेळा (१६ आणि २१ ऑक्टो.) ३७ अंश से. तापमान नोंदले गेले.
नोव्हेंबर महिन्याने यावर कडी केली आहे. सोमवारी सांताक्रूझ येथील हवामान केंद्रात ३७ अंश से. तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कमाल तापमान चढणीवरच राहत असले तरी गेल्या दशकभरात एकदाही तापमानाने ३७ अंश से. चा आकडा गाठला नव्हता.