October Heat Mumbai Maharashtra मुंबई : मोसमी पावसाने माघार घेतल्यापासून मुंबईसह राज्यातील इतर भागातही पुन्हा उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, सकाळपासूनच दमट वातावरण असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
राज्याच्या काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. तर आणखी काही भागातून पाऊस माघार घेण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. दरम्यान, ‘शक्ती’ चक्रीवादळ निवळल्यानंतर पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे.
सध्या राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची उघडीप असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. मुंबईतही हीच परिस्थिती आहे. मुंबईतून पाऊस माघारी जन्यपूर्वीही फारसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३३.४ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान मागील काही दिवसांच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी अधिक नोंदले गेले आहे. दरम्यान, सध्या आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघर्गजनेसह पावसाची शक्यता आहे. या भागात बुधवारपासून पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. इतर भागात मात्र पावसाची उघडीप राहील.
पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांतून माघर घेतली आहे. अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी , रक्सौलपर्यंत मोसमी वाऱ्यांची परतीची सीमा शनिवारी कायम होती. दरम्यान, पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशातील काही भागातून मोसमी पाऊस माघारी जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रत्नागिरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
रत्नागिरी येथे रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. पाऊस माघारी गेल्यानंतर पहिल्यांदाच कोकणात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याआधी प्रामुख्याने विदर्भ तसेच मराठवाडा भागात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, रविवारी रत्नागिरी येथील तापमान सर्वाधिक होते. त्याखालोखाल सांताक्रूझ येथे ३४.८ अंश सेल्सिअस, डहाणू ३३.७ अंश सेल्सिअस, अमरावती ३३.२ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर येथे ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
