मुंबई : जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्याच्या विविध भागात थंडी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमान वाढून थंडी एकदम कमी झाली. राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरी ३० ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. पुढील आठवडाभर कमाल – किमान तापमान चढेच राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागानेही संपूर्ण महिनाभर तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हिवाळ्यात प्रामुख्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी येते. पण, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर जानेवारीच्या अखेरपर्यंत कायम होता. त्यामुळे राज्यभरात चांगली थंडी पडली होती. सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. दुसरीकडे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे. त्यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढले आहे.

छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर राज्यभरात आकाश निरभ्र राहून तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी रत्नागिरी येथे सर्वाधिक ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये २६ अंश सेल्सिअस तापमान होते. कोकण किनारपट्टी,  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस होते. 

फेब्रुवारीत थंडी आणि पाऊसही कमीच

फेब्रुवारी महिन्यात देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीसह थंडीच्या  लाटांच्या संख्येत आणि कालावधीत घट होणार आहे. महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. गुजरात, राजस्थान, जम्मू – काश्मीर, ओदिशाचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तापमानच चढेच राहणार 

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाल्यामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. राज्यभरात कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने जास्त आहे. पुढील काही दिवस तापमानच चढेच राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.