मुंबई: चालक प्रशिक्षण केंद्र, वाहनांची माहिती, प्रवासी मदतवाहिनी यासह अन्य महत्त्वाची माहिती व अटींची पूर्तता न केल्याने मोबाईल ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना तात्पुरते ॲग्रीगेटर लायसन्स (अनुज्ञप्ती) देण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. अटींची पूर्तता ३० दिवसांत न केल्यास व त्याची माहिती उपलब्ध न केल्यास देण्यात आलेले तात्पुरते लायसन्स आपोआप रद्द होईल, असेही प्राधिकरणाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. अटींची पूर्तता केल्यावरच त्यांना कायमस्वरुपी अनुज्ञप्ती देण्यात येणार आहे.
ओला, उबरसह अन्य ॲप आधारित टॅक्सी कंपन्या वैध परवान्याशिवाय कार्यरत असल्याने त्यावर उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. या टॅक्सी कंपन्यांना त्यांची सेवा सुरू ठेवायची असेल तर १६ मार्च २०२२ पर्यंत वैध परवान्यासाठी अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने दिली होती. त्यावर १५ दिवसांत राज्य सरकारने निर्णय घेण्याचेही नमूद केले होते. त्यानुसार मुंबई महानगरातील आरटीओंकडे आठ कंपन्यांनी अर्ज केले. अंधेरी आरटीओकडे चार, ठाणे आरटीओकडे दोन आणि ताडदेव आरटीओकडे दोन कंपन्यांचे अर्ज आले होते. यामध्ये ओला, उबर, मेरु, मिहद्रा लॉजिस्टिक यांसह अन्य चार कंपन्यांचा समावेश आहे.
या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांचे अर्ज, त्यांनी दिलेली माहिती, अटींची पूर्तता यावर चर्चा करण्यात आली. ओला, उबर, मेरु, मिहद्रा लॉजिस्टिक या चार कंपन्यांनी मोटर वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना २०२० मधील अटी व अन्य काहीच बाबींची पूर्तता केल्याचे दिसून आले. आवश्यक अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी त्यांना कमी वेळ मिळाल्याने त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली. तोपर्यंत त्यांना तात्पुरते ॲग्रीगेटर लायसन्स जारी करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. मार्गदर्शक सूचना २०२० मधील अन्य अटींची पूर्तता न केल्यास त्यांचे लायसन्स आपोआप रद्द होईल, असा निर्णय प्राधिकरणाने घेतला. तर उर्वरित ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांनी वाहनचालक व वाहनाचे कागदपत्रे, सादर न करणे, प्रशिक्षणाची सुविधा इत्यादी महत्त्वाची माहिती सादर न केल्याने त्यांचे अर्ज नाकारण्यात आले. आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्यांच्या अर्जावर प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
कंपन्यांवरील आक्षेप
• सायबर सुरक्षा संदर्भातील प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही.
• शहर टॅक्सी योजनेतील सुविधांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नाही
• चालकांचे ओळखपत्र, लायसन्स, बॅच बिल्ला, किमान वाहन चालवण्याचा अनुभव, त्यांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी अशी माहिती उपलब्ध केली नाही.
• वाहनांची नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा इत्यादी तपशील सादर केलेला नाही.
• सेवा केंद्र स्थापन केल्याबद्दल स्पष्टता नाही. वाहनांमध्ये जीपीएस सुविधा असल्याबद्दल स्पष्टता नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temporary licenses alp based taxis recognition canceled conditions not met within 30 days rto driver training center vehicle information passenger helpline amy
First published on: 01-04-2022 at 03:34 IST