scorecardresearch

कोकण रेल्वेचा प्रवास आता सुकर ; लांब पल्ल्याच्या गाडय़ांना थांब्यासाठी दहा क्रॉसिंग स्थानके

गर्दीच्या वेळी मोठय़ा संख्येने जादा गाडय़ा सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतूक कोलमडते.

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेळ वाचण्यासाठी, नवीन गाडय़ा सेवेत याव्या यासाठी कोकण रेल्वेने क्रॉसिंग स्थानक प्रकल्प राबविला होता. हा प्रकल्प मार्च अखेरीस पूर्ण झाल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली. या प्रकल्पांर्तगत कोकण रेल्वे मार्गावर दहा नव्या क्रॉसिंग स्थानकांची भर पडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास सुकर होणार आहे.

कोकण रेल्वेवरुन प्रत्यक्षात कोकण आणि त्यामार्गे जाणाऱ्या गाडय़ांची संख्या जास्त आहे. याशिवाय मालवाहतूकही मोठय़ा प्रमाणात होते. सध्या वीर ते रोहा अशा ४६ किलोमीटर मार्गाचेच दुहेरीकरण झाले आहे.

गर्दीच्या वेळी मोठय़ा संख्येने जादा गाडय़ा सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतूक कोलमडते. त्यामुळे कोकण रेल्वेवर झालेल्या क्रॉसिंग स्थानक प्रकल्पामुळे रेल्वेला आणि प्रवाशांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

लूप लाईनही सेवेत

कोकण रेल्वेवर आठ लूप लाईनही सेवेत आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि हे फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्ण झाले. अधिक संख्येने गाडय़ांना सामावून घेण्यासाठी आणि ट्रेनचे कामकाज सुलभ करण्यासाठी स्टेशन परिसरात लूप लाइन तयार केल्या जातात. ज्यामध्ये अनेक इंजिनांसह पूर्ण लांबीची मालगाडी बसू शकते.

दहा नवीन स्थानके कोणती?

इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कळबनी, कडवई, वेरावली, खारेपाटण, आर्चिणे, मिरजन, इनजे अशी दहा क्रॉसिंग स्थानके सेवेत आली आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ten new crossing stations added on the konkan railway line zws

ताज्या बातम्या