डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेण्याकडे कल

सुमारे ३४ टक्के नागरिकांनी कोणत्याही सल्ल्याशिवाय स्वत:च औषधे घेतल्याचे नमूद केले.

करोनाकाळातील भीती, निर्बंधांचा परिणाम; ‘केईएम’च्या संशोधनातील निष्कर्ष

मुंबई : एकीकडे करोनाकेंद्री आरोग्य व्यवस्था आणि दुसरीकडे निर्बंधांमुळे रुग्णांना उपचार घेणे अडचणीचे झाल्यामुळे टाळेबंदीच्या काळात करोनाव्यतिरिक्त आजारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च औषधे घेण्याकडे कल वाढल्याचे केईएम रुग्णालयाच्या सामाजिक औषधशास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणात्मक अभ्यासातून निर्दशनास आले आहे.

दादर येथील नायगाव परिसरातील ३८० रहिवाशांचे डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले असून नुकताच हा अभ्यास ‘जर्नल ऑफ द असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. टाळेबंदीमध्ये ३८० रहिवाशांपैकी ६३ टक्के नागरिकांनी विविध आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतु सुमारे ३४ टक्के नागरिकांनी कोणत्याही सल्ल्याशिवाय स्वत:च औषधे घेतल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे यातील सुमारे दोन टक्के नागरिकांनी आजार असूनही त्याकडे दुर्लक्ष करून कोणतेही उपचार घेतेलेले नाहीत. उपचार घेण्याची आवश्यकता असलेल्यांपैकी सुमारे ५८ टक्के रुग्णांना गंभीर आजार असल्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नियमित तपासणी करायची होती, तर ३७ टक्के रुग्णांना विविध प्रकारचे त्रास होत असल्यामुळे उपचार घेण्याची गरज होती. चार टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, असे अभ्यासात मांडले आहे. सर्दी, खोकला, ताप यांसह दुखणे कमी करणारी औषधे कोणत्याही सल्ल्याशिवाय घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन, आयुर्वेदिक औषधे, काढा दररोज घेतल्याचेही यात नागरिकांनी नमूद केले आहे. 

या अभ्यासात नायगावमधील ५८ टक्के महिला आणि ४१ टक्के पुरुष सहभागी झाले होते. यापैकी २८ टक्के रहिवाशांनी तीव्र, तर ६१ टक्के जणांना गंभीर आजार होते. चार टक्के गर्भवती महिलांचाही यात समावेश होता. तसेच यातील ४६ टक्के जणांना उच्च रक्तदाब आणि ३५ टक्के जणांना मधुमेह होता.  एमबीबीएसचे विद्यार्थी शिरीष राव, डॅनिअल तहेरी, झोया खत्री आणि ईश्वरी लेले यांनी या विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास केला आहे.

३ टक्के रुग्ण उपचारापासून वंचित

करोनाची बाधा होण्याची भीती आणि निर्बंधांमुळे रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य नसल्यामुळे सुमारे ५५ टक्के रुग्ण आवश्यकता असूनही उपचार घेऊ शकलेले नाहीत. जवळील आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे १३ टक्के रुग्णांनी उपचार घेतलेले नाहीत, तर सुमारे तीन टक्के रुग्णांना पैसेच नसल्यामुळे उपचार घेता आलेले नाहीत, असे या अभ्यासात नमूद केले आहे. सात टक्के रुग्णांना उपचारांची आवश्यकता असूनही रुग्णालयांनी नाकारल्याचेही या अभ्यासात आढळले.

आजारांच्या तीव्रतेत वाढ

करोना साथीच्या काळामध्ये उपचार वेळेत न घेतल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची तीव्रता वाढून हृदयविकार, डायबेटिक फूट, रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे आढळले आहे.

संभाव्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने पूर्वतयारी

करोनाची तिसरी लाट आल्यास या काळात इतर आजारांच्या रुग्णांना वेळेत उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आपत्कालीन उपचारांच्या सुविधा सक्षम करून टेलिमेडिसिनच्या वापराविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित केले आहे.

साथीच्या काळात करोनाच्या भीतीने रुग्ण सरकारी रुग्णालयात येत नव्हते. बहुतांश खासगी आरोग्य सेवा सुरुवातीच्या काळात बंद होत्या. त्यामुळे रुग्णांचा स्वत:हून औषधे घेण्याकडे कल वाढला. तसेच यामुळे आजारांकडे दुर्लक्ष झाले हे प्रामुख्याने यातून स्पष्ट होते. – डॉ. गजानन वेल्हाळ, सामाजिक औषधशास्त्र विभाग प्रमुख, केईएम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tendency to take medicine without doctor advice akp

ताज्या बातम्या